गेला हत्ती कुणीकडे ?
By Admin | Updated: November 29, 2015 01:03 IST2015-11-29T01:03:48+5:302015-11-29T01:03:48+5:30
सतर्कतेचा इशारा : वनखात्याची शोधमोहीम

गेला हत्ती कुणीकडे ?
नेसरी : शुक्रवारी (दि. २७) अचानकपणे नेसरी परिसरात दाखल होऊन सर्वांना अचंबित केलेल्या टस्कर हत्तीची शोधमोहीम वनखात्याने दिवसभर सुरू केली. मात्र, दिवसभर हत्तीच्या मागावरून शोध घेणाऱ्या वनविभागाच्या पथकाला या टस्करने चकवा दिला. त्यामुळे हत्ती गेला कुणीकडे? असा प्रश्न वनविभागासह सर्वांना पडला आहे.
आजरा तालुक्यात अनेक दिवस ठाण मांडलेल्या या टस्कर हत्तीने शुक्रवारी रात्री सिरसंगी, वाटंगी मार्गे गडहिंग्लज तालुक्यात प्रवेश केला होता. पहाटे शिप्पूर, वाघराळी, हेळेवाडी तारओहोळ नदीकाठावरून दुपारी त्याने तारेवाडी जंगल गाठले. तेथून नागरिकांना दर्शन देत तो मेटाच्या डोंगरात घुसला व सायंकाळी तारेवाडी हद्दीतील जखणी नावाच्या शेतात थांबला होता. मात्र, रात्री अचानक अकराच्या सुमारास तो तारेवाडी बंधाऱ्याजवळून हडलगे जंगलात गेल्याच्या खुणा मिळाल्या.
शनिवारी दिवसभर या टस्कराच्या मागावर वनविभागाचे वनपाल, वनरक्षक व कर्मचारी होते. हडलगे जंगलात त्याची विष्ठा मिळाली. त्या मागावरून शोध घेण्याचा प्रयत्न केला; पण त्याला यश आले नाही. दिवसभरात तारेवाडी शेती, हडलगे जंगल, सांबरे, हेळेवाडी, बिद्रेवाडी, हेब्बाळ जलद्याळ, सामानगड परिसरासह चंदगड तालुक्यातील तेऊरवाडी व कामेवाडी जंगल पिंजून काढले; पण हत्तीचे लोकेशन सापडले नाही.
वनपाल एस. व्ही. राऊत, वनरक्षक संजय कांबळे, बी. एल. कुंभार, बी. बी. पाटील, आदी १३ जणांच्या पथकाने ही शोधमोहीम राबविली. परिसरात हत्ती निदर्शनास आल्यास वनविभागास कळवावे, तसेच शेतकरी व नागरिकांना सतर्कतेचा इशारा वनखात्याने दिला आहे. (वार्ताहर)