निनावी तक्रार अर्ज आता बेदखल
By Admin | Updated: October 16, 2015 00:02 IST2015-10-15T23:41:26+5:302015-10-16T00:02:01+5:30
डॉ. पी. एस. मीना : सर्व कार्यालयांना आदेश

निनावी तक्रार अर्ज आता बेदखल
एकनाथ पाटील -- कोल्हापूर -पूर्ववैमनस्यातून किंवा दबावाच्या भीतीने प्रशासकीय कार्यालयाकडे दाखल होणाऱ्या निनावी व खोट्या सहीने केलेल्या तक्रारींची आता दखल घेतली जाणार नाही. याबाबत अप्पर मुख्य सचिव डॉ. पी. एस. मीना यांनी निनावी व खोट्या तक्रारींची दखल घेऊ नये, असा आदेश मंत्रालयासह राज्यातील सर्व प्रशासकीय कार्यालयांना काढला आहे.
प्रशासकीय कार्यालयांमध्ये महसूल, पोलीस विभागाकडे सर्वाधिक निनावी तक्रारी दाखल होत असतात. आजअखेर अशा तक्रारींची तत्काळ दखल घेऊन चौकशी केली जात असे; परंतु बहुतांश तक्रार अर्ज हे प्रतिस्पर्धी व्यक्तीला बदनाम करण्यासाठी कार्यालयाकडे पाठविले जात असल्याचे निदर्शनास आल्याने केंद्र सरकारच्या १८ आॅक्टोबर २०१३ च्या शासन नियमानुसार अप्पर मुख्य सचिव डॉ. मीना यांनी तक्रारदाराचे नाव व पत्ता नोंद केलेला नाही, अशा निनावी तक्रारींमध्ये कोणत्याही स्वरूपाची माहिती अंतर्भूत असली तरी त्यावर कार्यवाही करण्यात येऊ नये, ती तक्रार फक्त दफ्तरी नोंद करावी, असा आदेश काढला आहे. या आदेशाप्रमाणे सर्वच शासकीय कार्यालयांतून कार्यवाही करण्यात येणार आहे.
आरोपात तथ्य असल्यास दखल
ज्या तक्रारींमध्ये पडताळणी करता येऊ शकेल, असे आरोप केलेले आहेत, अशा तक्रारी संबंधात प्रशासकीय किंवा मंत्रालयाने त्याची दखल घ्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मान्यतेने ती तक्रार मूळ तक्रारदाराकडे पाठवून ती त्याने स्वत: केली आहे काय, याबाबत खात्री करून घेण्यात यावी. त्यांच्याकडून पंधरा दिवसांत प्रतिसाद मिळाला नाही तर स्मरणपत्र पाठविण्यात यावे. त्यानंतरही माहिती प्राप्त न झाल्यास ही तक्रार खोट्या नावाची असल्याचे नोंद करून दफ्तरी दाखल करण्यात यावी. तसेच आपण स्वत: तक्रार केल्याचे मान्य केल्यास त्यावर कार्यवाही करताना तक्रार अर्जातील नाव, पत्ता गोपनीय ठेवून त्याची छायांकित प्रत काढून ती चौकशीसाठी संबंधित यंत्रणांकडे द्यावी व अर्जाप्रमाणे कार्यवाही करावी, असे या आदेशात म्हटले आहे.
हप्ता वसुलीची तक्रार
गंगावेश परिसरातील ऋणमुक्तेश्वर मंदिर परिसरात ग्रामीण भागातील शेतकरी, व्यापारी नेहमी भाजीपाला विक्रीसाठी बसत असतात. त्यांच्याकडून या परिसरातील काही तालमीचे कार्यकर्ते दमदाटी करत हप्ता गोळा करत असल्याचा निनावी अर्ज लक्ष्मीपुरी पोलिसांकडे आला. त्यानुसार तक्रारीचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी परिसरातील काही कार्यकर्त्यांना पोलीस ठाण्यात बोलावून चौकशी केली असता त्यामध्ये तथ्य नसल्याचे निष्पन्न झाले.