घोषणा बँकेची... लढाई ग्रामपंचायतीची !

By Admin | Updated: April 27, 2015 00:16 IST2015-04-26T23:44:31+5:302015-04-27T00:16:29+5:30

भाजप-सेनेची तलवार म्यान : काँगे्रसकडून मात्र अस्तित्व जपण्याची धडपड सुरूच!--सांगा डीसीसी कोणाची ?

Announcement of the Bank ... battle gram panchayatchi! | घोषणा बँकेची... लढाई ग्रामपंचायतीची !

घोषणा बँकेची... लढाई ग्रामपंचायतीची !

सागर गुजर - सातारा  सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेतील राष्ट्रवादीच्या सत्तेला हादरा देण्याची भाषा करणाऱ्या भाजप व शिवसेना या दोन्ही पक्षांनी तलवार म्यान केली. या बँकेचा कारभार चांगला चालण्याची पोहोच पावती दस्तूरखुद्द भाजपचे नेते व सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनीच देऊन टाकली, तर सेनेचे सहकारातील अस्तित्व लक्षात घेऊन लढणेच शक्य नसल्याचे शिवसेनेचे नेते व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगून टाकले. तसेच एक महिन्यापूर्वी बँकेची निवडणूक लढविण्याची घोषणा करणाऱ्या पालकमंत्र्यांनी आता केवळ ग्रामपंचायती निवडणुका लढविण्याचे जाहीर केले आहे. याउलट काँगे्रसची काही मंडळी पक्षाच्या स्वाभिमानासाठी आणि स्वत:चे अस्तित्व दाखवून देण्यासाठी लढा देत आहेत!
जिल्हा बँकेसाठी काँगे्रस पक्षाचे पॅनेल झाले नसले तरीही या पक्षाच्या पाच कार्यकर्त्यांनी स्वत:च्या पातळीवर लढा सुरू ठेवला आहे. काँगे्रसचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांनी माण तालुका सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज कायम ठेवला. वाई तालुक्यातील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व किसन वीर साखर कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार मदन भोसले यांचे निकटवर्तीय दिनकर (बापू) शिंदे यांनी वाई सोसायटी मतदारसंघातून माजी खासदार लक्ष्मणराव पाटील यांचे चिरंजीव नितीन पाटील यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. फलटण तालुका काँगे्रसचे माजी अध्यक्ष तुकाराम शिंदे यांनी खुद्द विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या विरोधात फलटण सोसायटी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज ठेवला आहे. शिंदे हे माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांचे निकवर्तीय आहेत. त्यामुळे त्यांना हिंदुराव व रणजितसिंह या पिता-पुत्रांची साथ मिळणार आहे.
नागरी बँका व पतसंस्था मतदारसंघातून प्रभाकर साबळे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार राजेश पाटील-वाठारकर यांच्या विरोधात आपला उमेदवारी अर्ज कायम ठेवला आहे. मूळचे काँगे्रसी विचारांच्या असणाऱ्या साबळे यांना अर्ज काढून घेण्यासाठी मनधरणी करण्यात आली होती. मात्र, त्यांनी राष्ट्रवादीकडे उमेदवारीची मागणीही केली नाही. तसेच अर्ज मागे घेण्यास स्पष्ट नकार दिला. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशीही राष्ट्रवादीचे वरिष्ठ मंडळी त्यांच्याशी संपर्क साधण्याचा वारंवार प्रयत्न करत होते; पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही.
काँगे्रसचे माजी जिल्हा परिषद सदस्य दिवंगत अविनाश धायगुडे-पाटील यांचे बंधू अजय धायगुडे-पाटील यांनी भटक्या विमुक्त जमाती मतदारसंघातून उमेदवारी कायम ठेवला आहे. त्यांच्या उमेदवारीसाठी खासदार उदयनराजे भोसले आग्रही होते. उदयनराजेंनी राष्ट्रवादीकडे ज्या तीन जागा मागितल्या होत्या. त्यात धायगुडे-पाटलांचा समावेश होता. दरम्यान, जावळीतील काँगे्रसचे ज्येष्ठ नेते साहेबराव पवार यांचे चिरंजीव दीपक पवार यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यावर काँगे्रसी विचारांचा पगडा आहे. त्यामुळे स्वाभिमानाची लढाई त्यांनीही सुरू ठेवली आहे.बहुतांश सहकारी संस्था राष्ट्रवादीच्या ताब्यात असल्या तरी ठिकठिकाणी काँगे्रसनेही आपले अस्तित्व राखून ठेवले आहे.

Web Title: Announcement of the Bank ... battle gram panchayatchi!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.