वर्धापन दिन पुरवणी लेख - संकटकाळातील नव्या वाटा - भाग २
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2021 04:26 IST2021-08-27T04:26:32+5:302021-08-27T04:26:32+5:30
कसबा बावड्यातील सविता रायकर यांनी गारमेंटचा व्यवसाय सुरू केला आणि संकट सुरू झालं. कापडांची दुकानंच बंद असल्याने ती तयार ...

वर्धापन दिन पुरवणी लेख - संकटकाळातील नव्या वाटा - भाग २
कसबा बावड्यातील सविता रायकर यांनी गारमेंटचा व्यवसाय सुरू केला आणि संकट सुरू झालं. कापडांची दुकानंच बंद असल्याने ती तयार करण्यात अडचणी आल्या. मग त्यांनी मास्कचा व्यवसाय सुरू केला. साधे मास्क, डबल मास्क, एन ९५ मास्क तयार बनविणे आणि त्यांची विक्री करण्यास सुरुवात केली. अचानक मोठे संकट आल्याने मास्क विक्रीला मोठा प्रतिसाद मिळाला. साने गुरुजी वसाहतीतील सुमित्र फराकटे यांनाही याचा मार्गाने जावे लागले. नंदिनी गारमेंट नावाने सुरू केलेला फराकटे यांचा व्यवसाय कोरोना काळात ‘सोशल सर्कल’ या ग्रुपच्या माध्यमातूनही सुरू ठेवला. सुमित्रा फराकटे सांगतात, आम्ही कोरोनाच्या काळात सुमारे २५० महिलांना घरबसल्या मास्क, कापडी पिशव्या शिवून देण्याचे काम दिले. काेरोना काळात आम्ही ११ लाख मास्क मुंबईच्या बाजारपेठेत विक्री केले. आम्हाला मास्क तयार करण्याचे काम मिळाले यापेक्षा अडचणीच्या काळात अडीचशे कुटुंबाना काम देऊन त्यांच्या घरखर्च भागेल अशी व्यवस्था करता आली याचा जास्त आनंद आहे.
कळंबा जेलसमोर असलेल्या शुभांगी साखरे यांनी तर कोरोनाच्या काळात विविध प्रकारचे कोरडे खाद्यपदार्थ तयार करून त्याची विक्री केली. याच पध्दतीने ज्यांच्या हाताला चव चांगली आहे अशा अनेक भगिनींनी खाद्यपदार्थ, बिर्याणी यासारखे पदार्थ बनवून देण्याचा फंडा अवलंबला आणि तो अनेकांच्या पसंतीस उतरला.
मंगळवार पेठेतील बेलबाग परिसरात राहणाऱ्या स्मिता खामकर याही जिद्दी महिला सध्या अनेकांच्या मदतीला धावून गेल्या आहेत. आठ महिन्यांपूर्वीपासून त्यांनी पारंपरिक गोधड्या तयार करण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. त्याचे दोनशे महिलांना ट्रेनिंग दिले असून त्यातील पन्नास महिला आता प्रत्यक्ष गोधड्या शिवण्यात पारंगत झाल्या आहेत. स्मिता सांगतात की, महामारीच्या काळात महिलांना आर्थिक पाठबळ मिळवून देण्याकरिता काही तरी केलं पाहिजे हा विचार माझ्या मनात आला आणि त्यातून एका टिपिकल गोधडीचा जन्म झाला. जुन्या साड्या व कपड्याच्या सहायाने त्या तयार केल्या जातात. आता आम्ही ‘संस्कार शिदोरी’या संस्थेच्या माध्यमातून मऱ्हाटमोळ्या गोधडीला प्रतिष्ठा मिळवून देण्याचा तसेच कोल्हापुरी ब्रँड बनविण्याचा आम्ही संकल्प केला आहे.
कोरोनाच्या काळात रोजगार बुडाल्यामुळे औद्योगिक वसाहतीतील कामगार बेकार झाले. लॉकडाऊनमुळे रिक्षा चालक बेकार झाले. दुकानात कामाला जाणाऱ्यांचे रोजगार बुडाले. कमी पगार आणि हातावरचं पोट असलेल्या या श्रमिक वर्गाने उपासमार होण्यापेक्षा भाजी विकलेली बरी म्हणून नवीन व्यवसाय सुरू केला. पहाटे मार्केट यार्ड येथून भाजी खरेदी करायची आणि ती शहराच्या विविध भागात जाऊन विकायची हा त्यांचा दिनक्रमच बनला. एरव्ही दोन हजारांच्या आसपास संख्या असणाऱ्या भाजी विक्रेत्यांची ही संख्या सहा-साडेसहा हजारांच्या घरात पोहचली. याचाच अर्थ कोरोना संसर्ग, लॉकडाऊनच्या काळात चार ते साडेचार हजार व्यक्तींनी भाजी विक्री करून आलेल्या संकटावर मात केली.
एकंदरीत विचार करता संकटाच्या काळातसुध्दा आलेल्या परिस्थितीवर मात करता येते हेच यावरून लक्षात येऊ शकते. फक्त संकटाला धीराने सामोरे जाणे अत्यंत महत्त्वाचे असते. सुरुवातीला थोडा त्रास होतो, पण काही दिवसांनी त्यात यश येते, व्यवसायाचा जम बसतो.
भारत चव्हाण,
वरिष्ठ उपसंपादक