जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताची वर्षपूर्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2021 04:22 IST2021-03-26T04:22:39+5:302021-03-26T04:22:39+5:30
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण बरोबर आज एका वर्षापूर्वी आढळून आला आणि ...

जिल्ह्यातील पहिल्या कोरोनाग्रस्ताची वर्षपूर्ती
कोल्हापूर जिल्ह्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण बरोबर आज एका वर्षापूर्वी आढळून आला आणि जिल्ह्यात खळबळ उडाली. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने उच्छाद मांडला आणि तितक्याच ताकदीने जनता आणि शासन, प्रशासनाने या संकटाचा मुकाबलाही केला. आता पुन्हा दिवसेंदिवस रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
येथील भक्तिपूजानगरमधील बहिणेकडे पुण्याहून ३९ वर्षांचा युवक २० मार्च रोजी रेल्वेने कोल्हापुरात आला होता. ताप आणि घशात खवखव जाणवू लागल्याने त्याची २५ मार्च रोजी सीपीआरमध्ये तपासणी करण्यात आली आणि तो २६ मार्च रोजी पॉझिटिव्ह आला. शहरासह जिल्ह्यात खळबळ उडाली. तो ज्या रेल्वेतून आला त्या डब्यातील सर्वांची तपासणी करण्यात आली. यानंतर काही दिवसांनी त्याच्या बहिणीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आणि नंतर हळूहळू ही संख्या वाढू लागली.
मार्च २०२० मध्ये एका रुग्णाने सुरू झालेला कोरोनाचा हा प्रवास सप्टेंबर २०२० मध्ये २१ हजार २७० या आकड्यावर जाऊन पोहोचला आणि त्यानंतर तो खाली- खाली येऊ लागला. आता एक वर्षानंतरचा आढावा घेता जिल्ह्यातील कोरोना रुग्णांचा आकडा ९१४ वर आला आहे.
चौकट
पहिला रुग्ण सापडला २६ मार्च २०२०
कोरोनाची सद्य:स्थिती
वर्षभरातील कोरोनाचे रुग्ण ५१ हजार ४७६
बरे होऊन घरी गेलेले रुग्ण ४९ हजार ११५
बळी पडलेले रुग्ण १,७५९
उपचार सुरू असलेले रुग्ण ६०२
चौकट
सुरू असलेले कोविड सेंटर्स
शासकीय रुग्णालये ९
खासगी रुग्णालये ६
चौकट
...असे वाढले रुग्ण
महिना रुग्ण
मार्च २०२० ०१
एप्रिल ०९
मे ४८१
जून ३४७
जुलै ४,८५७
ऑगस्ट १२,२७२
सप्टेंबर २१,२७०
ऑक्टोबर ३,८३६
नोव्हेंबर ८७३
डिसेंबर ५२२
जानेवारी २०२१ ४३१
फेब्रुवारी ६०१
मार्च ९१४
चौकट
पुरेसा औषधसाठा
जिल्ह्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी औषधपुरवठा पुरेसा असल्याचे सांगण्यात आले. आवश्यक मास्क, सॅनिटायझेन साहित्य, पीपीई किट व आनुषंगिक साहित्य आणि लागणाऱ्या औषध- गोळ्या पुरेशा आहेत, असे सांगण्यात आले.
चौकट
जिल्ह्यात एकूण १५ सेंटर्स
सध्या जिल्ह्यात कोविड रुग्णांवर उपचार करणारी १५ केंद्रे आहेत. यातील ९ शासकीय, तर सहा खाजगी आहेत. सध्याच्या रुग्णांसाठी ही संख्या पुरेशी असली तरी यापुढच्या काळात ही केंद्रे वाढवावी लागतील, अशी परिस्थिती आहे.
कोट
मी कोल्हापुरात आलो असताना मला कोरोनाची लागण झाली; परंतु त्याचा त्रास माझ्या कोल्हापुरातील बहिणीला आणि नातेवाइकांना झाला. मात्र, माझाही नाइलाज होता. त्यानंतर माझी तब्येत अतिशय उत्तम आहे. त्यानंतर गेले वर्षभर मी कुठेही गेलो नाही. मात्र, पुण्यातील रुग्णसंख्या वाढत असल्याने काळजी वाटते.
-पुणेस्थित असलेला; परंतु कोल्हापूर जिल्ह्यातील पहिला कोरोना रुग्ण