अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील गाडी आजऱ्यात
By Admin | Updated: August 18, 2015 23:45 IST2015-08-18T23:45:13+5:302015-08-18T23:45:13+5:30
कदम याच्या मेहरबानीने या लाभार्थ्याला हे कर्ज देण्यासाठी थेट कर्ज योजनेच्या अटींनाही बगल देण्यात आली. सात लाख कर्जमर्यादा असताना तब्बल बारा लाख पस्तीस हजारांचे कर्ज देण्यात आले

अण्णा भाऊ साठे महामंडळ घोटाळ्यातील गाडी आजऱ्यात
संदीप खवळे -कोल्हापूर -लोकशाहीर अण्णा भाऊ साठे महामंडळातील ३८५ कोटींच्या घोटाळ्यातील सुमारे पंधरा लाखांची आलिशान गाडी कोल्हापूर जिल्ह्णातील आजरा तालुक्यातील चव्हाणवाडी येथील लाभार्थ्याकडे आहे. या गाडीसाठी महामंडळाच्या थेट कर्ज योजनेतून बारा लाख पस्तीस हजार रुपयांचे कर्ज कागदपत्राशिवाय एका दिवसांत वितरित केले. थेट कर्ज योजनेची कमाल कर्जमर्यादा सात लाख असतानाही या व्यक्तीला १२ लाखांपेक्षा जास्त रकमेचा धनादेश देण्यात आला, अशी माहिती महामंडळाच्या अधिकृत सूत्रांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.या लाभार्थांने मुंबईत राहणाऱ्या पाहुण्यांकडून महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम यांच्याकडे वशिला लावून ही आलिशान गाडी शिरोली (जि.कोल्हापूर) येथील एका नामांकित शोरूममधून २०१४ मध्ये खरेदी केली. खरेदीसाठी महामंडळाकडून १२ लाख पस्तीस हजार रुपयांचा धनादेश रातोरात देण्यात आला. थेट कर्ज योजनेच्या अटीनुसार भरावयाची पाच टक्के रक्कमही या लाभार्थ्याकडून भरून घेण्यात आली नाही. थेट कर्ज योजनेंतर्गत जास्तीत जास्त सात लाख रुपयांचे कर्ज देण्यात येते. कदम याच्या मेहरबानीने या लाभार्थ्याला हे कर्ज देण्यासाठी थेट कर्ज योजनेच्या अटींनाही बगल देण्यात आली. सात लाख कर्जमर्यादा असताना तब्बल बारा लाख पस्तीस हजारांचे कर्ज देण्यात आले. कागदपत्रांची शहानिशाही करण्यात आली नाही. घोटाळा बाहेर येताच त्यांने पाच टक्के रक्कम आणि कर्जाचे हप्ते भरण्यास सुरुवात केली.
एकीकडे महामंडळात हजारो अर्ज प्रलंबित असताना, नियमबाह्य कर्जाचे वाटप झाल्यामुळे गरजूंची गोची झाली आहे. महामंडळाच्या कोल्हापूर जिल्हा कार्यालयात विविध योजनेसाठी मंजूर झालेले ३०० अर्ज निधीअभावी धूळ खात आहेत. अध्यक्षाच्या चुकीमुळे गरजू लाभार्थ्यांना फटका बसत आहे. प्रकरण बँकांनी मंजूर केले आहे, पण अनुदानासाठी निधी नसल्यामुळे लाभार्थी चिंतेत आहेत.