अंनिसतर्फे गुरुवारपासून जबाव दो आंदोलन
By Admin | Updated: July 17, 2017 15:27 IST2017-07-17T15:27:44+5:302017-07-17T15:27:44+5:30
हिंसा के खिलाफ मानवता की ओर" विषयावर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन

अंनिसतर्फे गुरुवारपासून जबाव दो आंदोलन
आॅनलाईन लोकमत
कोल्हापूर, दि. १६ : डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि अॅड. गोविंद पानसरे यांच्या मारेकऱ्यांना पकडण्यात अद्यापही पोलिसांना यश आलेले नाही. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीतर्फे गुरुवारपासून (दि.२०)जवाब दो" आंदोलन आणि हिंसा के खिलाफ मानवता की ओर" विषयावर जिल्ह्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण़्यात आले आहे अशी माहिती जिल्हा प्रधान सचिव दिलीप कांबळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. याअंतर्गत संसद आणि विधानभवनात प्रश्न उपस्थित करण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह जिल्ह्यातील सर्व आमदार खासदारांना निवेदन देण्यात येणार आहे.
गुरुवारपासून जिल्ह्यातील पंधरा महाविद्यालयांत महिन्याभरात युवा संकल्प परिषदा होणार असून, १९ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली जाणार आहेत. २० आॅगस्टला पोवाडे, सोंगी भजन अशा लोककलांतून प्रबोधन व शासन तपास यंत्रणांचा निषेध नोंदवला जाणार आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन आणि शहीद डॉ. नरेंद्र दाभोलकर" या विषयावर माध्यमिक शाळांतून प्रबोधन होईल. एक उपवास वेदनेचा" या अंतर्गत महिन्याभरात दररोज एक कार्यकर्ता कुटुंबीयांसह उपोषण करणार आहे.
निळू फुले फिल्म सर्कलच्या माध्यमातून विविध ठिकाणी लघुपट दाखवले जातील. जिल्हास्तरीय शालेय निबंध स्पर्धाही या काळात होतील. १८ आॅगस्टला संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात अजित दळवी लिखित अतुल पेठे दिग्दर्शित समाजस्वास्थ" नाटकाचा प्रयोग होईल. जिल्ह्यातील विविध ठिकाणी मॉर्निंग वॉक उपक्रमही होणार आहेत. यावेळी कपील मुळे, कृष्णात कोरे, सुनिल माने, गीता हसूरकर, राजवैभव कांबळे, पंकज खोत, संघसेन जगतकर, सुनिल स्वामी, डॉ. शरद भूताडिया उपस्थित होते.