‘अंनिस’चा रक्तदानातून आत्मक्लेष
By Admin | Updated: July 20, 2014 23:17 IST2014-07-20T23:14:47+5:302014-07-20T23:17:41+5:30
विवेकवाहिनीची साथ : दाभोलकरांच्या मारेकऱ्यांचा निषेध

‘अंनिस’चा रक्तदानातून आत्मक्लेष
सातारा : ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला ११ महिने पूर्ण झाले तरीही खुनाच्या तपासात प्रगती नाही. त्यांचे हे बलिदान व्यर्थ जाणार नाही. या भावनेने त्यांचे कार्यकर्ते जोमाने चळवळ पुढे नेत आहेत. आजपर्यंत दर महिन्याच्या २० तारखेला समितीचे कार्यकर्ते अहिंसक मार्गाने हत्येचा निषेध करत आले आहेत. रविवार, दि. २० जुलै रोजी सामाजिक भावनेतून कार्यकर्त्यांनी रक्तदान केले. त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला.
येथील माउली ब्लड बँकेच्या सहकार्याने हे रक्तदान शिबिर पार पडले. समितीचे कार्यकर्ते, विवेकवाहिनीचे कार्यकर्ते तसेच सातारा परिसरातील नागरिकांनी यावेळी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करून डॉ. नरेंद्र दाभोलकरांना आदरांजली वाहिली.
‘डॉ. दाभोलकर यांनी दि. २० आॅगस्ट २०१३ रोजी समाजासाठी रक्त सांडले. त्यांच्या मारेकऱ्यांना अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते प्रत्येक महिन्याच्या २० तारखेला रक्तदान करून विधायक उत्तर देत आहेत. मारेकऱ्यांचा शोध लावण्यात तपास यंत्रणेला अद्याप यश आले नाही. याची खंत कार्यकर्त्यांना असून, याचाच आत्मक्लेष म्हणून स्वयंस्फूर्तीने रक्तदान करीत आहेत,’ असे डॉ. हमीद दाभोलकर यांनी सांगितले.
आतापर्यंत पुणे, लातूर, धुळे, सोलापूर, कोल्हापूर जिल्ह्यांतील विविध शाखांनी २० तारखेला रक्तदान शिबिर आयोजित केले होते. यापुढेही राज्यभरातील कार्यकर्ते अशी रक्तदान शिबिरे आयोजित केली आहेत.
यावेळी डॉ. मधुकर पारंगे, डॉ. शैला दाभोलकर, डॉ. हमीद दाभोलकर, विजय मांडके, उदय चव्हाण, उद्धव शिंगटे, हौसेराव धुमाळ, वैशाली जांभळे, पूजा जाधव, शिवप्रसाद मांगले, प्रा. भागवत शिंदे, प्रा. आर. वाय. जाधव, भगवान रणदिवे, दशरथ रंधवे, वल्लभ वैद्य यांच्यासह अंनिस आणि विवेकवाहिचे कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)