फुलेवाडीची तटबंदी अनिल भालेकर

By Admin | Updated: December 29, 2016 01:10 IST2016-12-29T01:10:23+5:302016-12-29T01:10:23+5:30

फुलेवाडी संघातून खेळणाऱ्या अनिल सदाशिव भालेकर याचा जन्म फुलेवाडीत झाला.

Anil Bhalekar, the walled city of Phoolavadi | फुलेवाडीची तटबंदी अनिल भालेकर

फुलेवाडीची तटबंदी अनिल भालेकर

फुलेवाडी संघात गोलरक्षक म्हणून अनिलने १० वर्र्षे किल्ला लढविला. आपल्या कौशल्यामुळे त्याने ‘फुलेवाडीची तटबंदी’ हे बिरुद अभिमानाने मिरविले. फुटबॉलबरोबरच त्याने क्रिकेटमध्येही आपली क्षमता सिद्ध केली होती.

फुलेवाडी संघातून खेळणाऱ्या अनिल सदाशिव भालेकर याचा जन्म फुलेवाडीत झाला. गोलकीपरची जागा अत्यंत महत्त्वाची आणि अवघड. कारण बॉल सुटला की प्रेक्षकांसह सहकाऱ्यांची एकच ओरड; पण बॉल पकडला की वाहवा! पण, अनिलने ही जागा मोठ्या आत्मविश्वास व हिमतीने किल्ल्याच्या तटाप्रमाणे लढविली. खेळाप्रमाणे त्याने आपल्या शिक्षणाकडेही लक्ष दिले. त्याने न्यू कॉलेजमधून बी.ए.(आॅनर्स) ही पदवी प्राप्त केलीच शिवाय उचगावमधील पॉलिटेक्निकमधून डिप्लोमा इन सिव्हिल इंजिनियर ही पदविका प्राप्त केली.
अनिल फुलेवाडीमधील महात्मा फुले या महानगरपालिकेच्या प्राथमिक शाळेत असताना टेनिस बॉल क्रिकेट खेळण्यात दंग असे. मात्र, मोठ्यांचा फुटबॉल खेळ पाहून त्यालाही फुटबॉल खेळाबद्दल आवड निर्माण झाली. ४ फूट ११ इंच मापाच्या फुटबॉल स्पर्धेत तो सलग तीन वर्षे खेळला. शिवाजी मराठा हायस्कूलमध्ये प्रवेश घेतल्यानंतर १९८४ पासून शालेयस्तरावर गोलकीपर या जागेवर खेळू लागला. फुलेवाडीतील क्रीडा मैदान, शिवाजी मराठा हायस्कूलचे मैदान येथे तो सराव करीत होता.
याचकाळात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ नुकतेच नावारूपाला येऊ लागले होते. फुलेवाडीचे फुटबॉलप्रेमी महादेव शेळके (बापू), अमर अपराध, अनिल मंडलिक यांचे मार्गदर्शन व प्रेरणेमुळे फुलेवाडीच्या सीनियर संघात अनिलची गोलकीपर म्हणून निवड झाली. पुढे १० वर्षे अनिल या संघात गोलकीपर या जागेवर खेळला. फुलेवाडी संघाला नावारूपास आणण्यात त्याचा सिंंहाचा वाटा होता.
फुलेवाडी संघातून त्याने अनेक स्पर्धा गाजविल्या. त्याच्या खेळामुळे त्याची कोल्हापूर जिल्हा कंबाईन संघात गोलकीपर म्हणून निवड झाली होती. नागपूर येथे झालेल्या स्पर्धेत त्याने अप्रतिम कामगिरी केली. या सीनियर स्पर्धा खेळत असतानाच अनिलने न्यू कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. त्याच्या गोलरक्षणाची कीर्ती न्यू कॉलेजमध्ये अगोदरच माहीत झाली होती. या कॉलेजच्या फुटबॉल संघातून सलग तीन वर्षे तो विभागीय व आंतर विभागीय सामने विविध ठिकाणी खेळला. न्यू कॉलेजला त्याने अनेकदा पराजयाच्या खाईतून बाहेर काढले. शिवाजी विद्यापीठाला पश्चिम विभागीय स्पर्धेकरिता निवड समितीला त्याचा विचार करावा लागला. त्याची निवड होऊन नागपूर या ठिकाणी झालेल्या वेस्ट झोन स्पर्धेत तमाम नागपूरकर रसिक प्रेक्षकांना आपल्या गोलरक्षणाचे कौशल्य दाखविले.
अनिलने फुटबॉल बरोबरच किक्रेटमध्येही अनेक स्पर्धा जिंकून दिल्या. एकदा दिलबहार विरुद्धच्या सामन्यात गुडघ्याला मार लागून दुखापत झाली होती. त्याने अनेक स्थानिक सामन्यांत कठीण परिस्थितीतून फुलेवाडी संघास विजयी केले.
एकदा फुलेवाडी - प्रॅक्टिस दरम्यान सामना सुरू होता. या सामन्यात फुलेवाडी पराभूत झाल्यास फुलेवाडी संघ पुन्हा ज्युनिअर गटात जाणार होता. हा सामना बरोबरीत सुटला; पण टायब्रेकमध्ये अनिलने फुलेवाडीस पराजयातून व ज्युनिअर गटात जाण्यापासून वाचविले.
(उद्याच्या अंकात : संतोष तावडे)



प्रा. डॉ. अभिजित वणिरे

Web Title: Anil Bhalekar, the walled city of Phoolavadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.