अंगणवाडीसेविकांची शिरोळ पंचायत समितीवर ‘धडक’
By Admin | Updated: July 1, 2015 00:13 IST2015-07-01T00:13:08+5:302015-07-01T00:13:08+5:30
शनिवारी निर्णय : खासगी अंगणवाड्या बंद करण्याचे आश्वासन

अंगणवाडीसेविकांची शिरोळ पंचायत समितीवर ‘धडक’
शिरोळ : खासगी बालवाड्या तत्काळ बंद कराव्यात, अंगणवाडीसेविका व मदतनिसांना किमानवेतन कायदा लागू करावा, मानधनाच्या फरकाची रक्कम तत्काळ मिळावी, यासह विविध मागण्यांप्रश्नी कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने मंगळवारी, शिरोळ पंचायत समितीच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.
सध्या कोल्हापूर जिल्ह्यात खासगी शाळांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अंगणवाडीमध्ये येणाऱ्या मुलांची संख्या कमी झाली आहे. काही ठिकाणी जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये खासगी स्वरूपात बालवाड्या सुरू आहेत. प्रमुख १५ मागण्यांकरीता कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्यावतीने अंगणवाडीसेविका व मदतनिसांनी येथील शिवाजी चौकातून मोर्चास सुरुवात केली. शासनाच्या विरोधात घोषणा देत मोर्चा पंचायत समितीच्या कार्यालयासमोर आल्यानंतर त्याचे रूपांतर सभेत झाले.
यावेळी शिष्टमंडळ व उपसभापती वसंत हजारे, पं. स. सदस्य सर्जेराव शिंदे, प्रकल्प अधिकारी उदयकुमार कसुरकर यांच्यात बैठक झाली. चर्चेमध्ये तालुक्यातील खासगी बालवाड्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. अंगणवाडीसेविका व मदतनिसांची शनिवारी (दि. ४) बैठक घेण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच सर्व मागण्यांबाबत शासनाकडे पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
मोर्चात जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनचे आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, शमा पठाण, आरती लाटकर, सुनंदा टारे, विद्या कांबळे, मंगल माळी, अंजली श्रीसागर, सुनंदा कुऱ्हाडे, मंगल गायकवाड, शोभा भंडारे यांच्यासह तालुक्यातील अंगणवाडीसेविका व मदतनीस सहभागी झाल्या होत्या. (प्रतिनिधी)