जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
By Admin | Updated: September 3, 2015 00:18 IST2015-09-03T00:18:51+5:302015-09-03T00:18:51+5:30
अंगणवाडी कर्मचारी युनियन : जिल्हा परिषद स्तरावरील सेविकांच्या मागण्या १५ दिवसांत पूर्ण करणार : अविनाश सुभेदार

जिल्हा परिषदेवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा ठिय्या
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या जिल्हा परिषद स्तरावरील मागण्या, अडचणी येत्या १५ दिवसांत सोडविल्या जातील, असे आश्वासन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश सुभेदार यांनी बुधवारी दिले. कोल्हापूर जिल्हा अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या शिष्टमंडळाशी चर्चा करताना त्यांनी हे आश्वासन दिले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) शिल्पा पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.वेगवेगळ्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी युनियनचे नेते आप्पा पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा परिषदेवर अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचा मोर्चा काढण्यात आला. मोर्चाने जिल्हा परिषद कार्यालयाजवळ येऊन कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळच सेविका, मदतनीस यांनी ठिय्या मारला. त्यानंतर आप्पा पाटील, जयश्री पाटील, सरिता कंदले, अर्चना पाटील, सुलोचना मंडपे, शमा पठाण, शोभा भंडारे, सुचित्रा शिनगारे, सुनंदा कुराडे, विद्या कांबळे, अंजली क्षीरसागर यांचे शिष्टमंडळ सीईओ सुभेदार यांच्या कक्षात गेले. तेथे सुभेदार यांच्याशी जिल्हा परिषद स्तरावरील प्रत्येक मागणीवर सविस्तर चर्चा केली. यावेळी बोलताना आप्पा पाटील म्हणाले, सीईओंनी गेल्या बैठकीत प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेला मानधन जमा करावे, अशी सूचना दिली होती. मात्र, याची अंमलबजावणी होत नाही.
सीईओ सुभेदार म्हणाले, ज्या गावात खासगी अंगणवाड्या सुरू आहेत, त्या गावांची नावे द्यावीत. त्यांच्यावर कारवाई केली जाईल. प्रत्येक महिन्याच्या ५ तारखेच्या आत मानधन जमा करण्याची काटेकोरपणे अंमलबजावणी होते की नाही, याकडे लक्ष दिले जाईल. (प्रतिनिधी)
पालकमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
कोल्हापूर : अंगणवाडी सेविका, मदतनीस यांचे मानधन वेळेत द्यावे यांसह विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी जिल्हा अंगणवाडी कर्मचारी संघटनेतर्फे येथील शासकीय विश्रामगृहावर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची भेट घेण्यासाठी मोर्चा काढण्यात आला. मात्र, मंत्री पाटील नसल्याने त्यांच्या स्वीय सहायकांनी येऊन मागण्यांचे निवेदन स्वीकारले. यावेळी येत्या पंधरा दिवसांत मागण्या मान्य न झाल्यास पालकमंत्री पाटील यांच्या घरासमोर ठिय्या आंदोलन सुरू करण्याचा इशारा स्वीय सहायकास दिला. दरम्यान, राज्यस्तरावर आंदोलनाची दिशा ठरविण्यासाठी मुंबई येथे ९ सप्टेंबर रोजी अंगणवाडी कृती समितीची बैठक होणार आहे.
अंगणवाडी सेविका, मदतनिसांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा मिळावा, महागाई भत्ता द्यावा, अंगणवाडी सेविकांना प्रतिमहिना १० हजार व मदतनिसांना सात हजार वेतन द्यावे, प्रत्येक वर्षाला एक वेतनवाढ करावी, चार ते सहा महिने थकलेले मानधन द्यावे, मानधनवाढीच्या फरकाची रक्कम द्यावी, भाऊबीज भेट द्यावी, मे महिन्यात एक महिना पगारी सुटी द्यावी, ३० एप्रिल २०१४ रोजीच्या शासन निर्णयानुसार अंगणवाडी सेविका, मदतनीस यांच्या मानधनात १ एप्रिलपासून वाढ द्यावी, गणवेशासाठी ८०० रुपये द्यावेत, ग्राम बालविकास योजनेत काम करणाऱ्या सेविका आणि मदतनिसांना प्रतितासाला ३५ रुपयांप्रमाणे भत्ता द्यावा, साहित्य अंगणवाडीत पोहोच करावे, या मागण्यांसाठी अनेक वेळा अर्ज, विनंत्या, निवेदने देण्यात आली; पण मागण्या पूर्ण झाल्या नाहीत. त्यामुळे महावीर गार्डनपासून मोर्चाला प्रारंभ केला. स्टेशन रोडपासून मोर्चा फिरून आला. शासकीय विश्रामगृहात त्याची सांगता करण्यात आली. हा मोर्चा कामगार नेते अतुल दिघे, सुवर्णा तळेकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आला होता. मोर्चात छाया तिप्पट, सुलेखा मुलाणी यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस सहभागी झाल्या होत्या.
महिलांना प्रचंड त्रास
अनेक अंगणवाडी सेविका, मदतनीस बसस्थानकापासून शासकीय विश्रामगृहापर्यंत चालत आल्या होत्या. थकल्यामुळे सोबत आणलेल्या डब्यातील जेवणही काहीजणींनी केले. दरम्यान, मोर्चा कावळा नाक्यावरील शासकीय विश्रामगृहात समाप्त झाला. त्यामुळे नवीन विश्रामगृहात मोर्चाची प्रतीक्षा करीत थांबलेल्या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची निराशा झाली. नियोजनातील विस्कळीतपणामुळे महिलांना प्रचंड त्रास झाला.