अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत
By Admin | Updated: April 28, 2015 00:34 IST2015-04-27T21:45:42+5:302015-04-28T00:34:13+5:30
उपासमारीची वेळ : आठ महिन्यांपासून मानधन नाही

अंगणवाडी सेविका मानधनाच्या प्रतीक्षेत
राजाराम कांबळे - मलकापूर
शाहूवाडी तालुक्यातील पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या व बालविकास प्रकल्पाकडे काम करणाऱ्या अंगणवाडी सेविकांना राज्य शासनाने गेले आठ महिने मानधन दिलेले नाही. त्यामुळे ग्रामीण भागातील सेविकांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. गेले आठ महिने मानधनासाठी त्यांचा संघर्ष सुरू आहे.
शाहूवाडी तालुक्याच्या डोंगर कपारीत २९१ अंगणवाडी व ३२ मिनी अंगणवाडी कार्यरत आहेत. तालुक्यात १३१ गावे व २५० वाड्या-वस्त्या आहेत. २९० अंगणवाडी सेविका, २८९ मदतनीस व २८ मिनी अंगणवाडी सेविका आहेत. त्यांना केंद्र व राज्य शासनाकडून दर महिन्याला मानधन दिले जाते. यामध्ये केंद्र शासनाकडून राज्य शासनाला नियमित मानधन पाठविले जाते. त्यात राज्य शासनाकडून दर महिन्याला शाहूवाडी तालुक्यातील अंगणवाडी सेविकांना प्रतिमाह २ लाख २५ हजार ४८६ रुपये मानधन जमा केले जाते. गेले आठ महिने राज्य शासनाने तालुक्याचे १८ लाख ३ हजार ८८८ रुपये मानधन थकविले आहे.
आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लागावा यासाठी ग्रामीण महिला अंगणवाडी सेविका झाल्या; पण बिनपगारी फुल्ल अधिकारी होण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. आपले मानधन जमा झाले की नाही यासाठी त्यांना पन्नास ते साठ किलोमीटर अंतरावरून हेलपाटे मारावे लागत आहेत. शासनाने अंगणवाडी सेविकांचे मानधन त्यांच्या खात्यावर जमा करावे, अशी मागणी होत आहे.
कर्जबाजारी होण्याची वेळ
तालुक्यातील वाड्या-वस्त्यांवर, धनगरवाडे, डोंगरकपारीत जाऊन अंगणवाडी सेविका काम करीत आहेत. तुटपुंज्या मानधनावर समाधान मानून त्या काम करीत आहेत. मात्र, शासनाने त्यांचे मानधन दिले नसल्यामुळे त्यांच्यावर आर्थिक संकट कोसळले आहे. केंद्र शासनाने मार्च, एप्रिलचे मानधन दिलेले नाही. शासनाने अंगणवाडी सेविकांना ३० एप्रिल २०१४ ला ९५० रुपये वाढ जाहीर केली होती. ती वाढदेखील दिलेली नाही. शासनाने चालू वर्षी दीपावलीला एक हजार रुपये भाऊबीज जाहीर केली होती, तीदेखील दिलेली नाही. आर्थिक संकटात सापडलेल्या अंगणवाडी सेविकांना कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे.