...अन् लागली सरपंचपदाची लॉटरी
By Admin | Updated: April 8, 2015 00:34 IST2015-04-07T20:16:31+5:302015-04-08T00:34:17+5:30
सत्ताधारी सदस्यांची गैरहजेरी पडली पथ्यावर

...अन् लागली सरपंचपदाची लॉटरी
नेसरी : जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर यांच्या आदेशानुसार बिद्रेवाडी (ता. गडहिंग्लज) येथील सरपंचपद रिक्त असलेने ते भरण्यासाठी बोलावलेल्या विशेष सभेत सर्वसाधारण स्त्री प्रवर्गासाठी आरक्षित असलेल्या जागेसाठी एकमेव महिला सदस्या उपस्थित राहिल्याने त्यांना सरपंचपदाची लॉटरी लागली; तर सत्ताधारी सदस्यांकडे बहुमत असूनही या सभेकडे गांभीर्याने न पाहिल्याने त्यांच्यावर नामुष्कीची वेळ आली. सभेस उपस्थित राहिलेल्या व आपला सरपंचपदाचा अर्ज भरलेल्या लता राजन कांबळे यांच्या गळ्यात अलगदपणे सरपंचपदाची माळ पडल्याने अल्पमतातील विरोधी मंडळींनी बाजी मारली. या निवडीचे आश्चर्य मात्र सर्वत्र व्यक्त होत आहे.बिद्रेवाडी गावची ग्रामपंचायत निवडणूक २०१२ मध्ये झाली होती. सरपंचपद हे सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित असलेने शोभा संजय पाटील या बहुमताने सरपंच, तर सुभाष कुराडे उपसरपंचपदी विराजमान झाले होते. यासाठी स्थानिक पुढारी व नेत्यांनी दीड-दीड वर्षाचा कार्यकाल ठेवला होता. मात्र, पाटील यांनी अडीच वर्षांनंतर आपला सरपंचपदाचा राजीनामा दिला. ४ फेब्रुवारी २०१५ रोजी राजीनामा दिल्याने हे रिक्त पद भरण्यासाठी १८ मार्चच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आदेशान्वये ३० मार्चला दुपारी २ वाजता विशेष सभा बोलावली होती. मात्र, ७ सदस्य असलेल्यापैकी लता कांबळे व दिनकर यल्लाप्पा कांबळे या दोनच सदस्यांनी या विशेष सभेस उपस्थिती लावली. पाच सदस्य गैरहजर राहिले.
या सभेत कांबळे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यांना उपस्थित सदस्य दिनकर कांबळे यांनी सूचक म्हणून स्वाक्षरी दिली. त्यांचा अर्ज वैध झाला. मात्र, या सभेचा कोरम पूर्ण होत नसल्याने ही सभा तहकूब केली व दुसऱ्या दिवशी पुन्हा सभा बोलावली. पण या सभेलाही सत्ताधारी असलेल्या ५ सदस्यांनी पुन्हा पाठ फिरवल्याने व तहकूब सभेला कोरमची आवश्यकता नसल्याने आणि अन्य कोणाचा अर्ज आला नसल्याने कांबळे यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. (वार्ताहर)