...अन् लाटगावची संक्रांत झाली ‘गोड’!
By Admin | Updated: January 17, 2015 00:34 IST2015-01-17T00:32:41+5:302015-01-17T00:34:55+5:30
दलित-सवर्ण वाद मिटला : प्रशासनाला यश; वीस वर्षांचा तिडा

...अन् लाटगावची संक्रांत झाली ‘गोड’!
ज्योतिप्रसाद सावंत - आजरा -लाटगाव (ता. आजरा) येथील सवर्ण मंडळींकडून दलित बांधवांना दिल्या जाणाऱ्या कथित अन्यायी व बहिष्कृतपणाच्या वागणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली. मात्र, तहसीलदार शिल्पा ठोकडे व पोलीस निरीक्षक सी. बी. भालके यांनी ग्रामदैवत नागनाथ मंदिरात बैठक घेऊन हा वाद संक्रांतीच्या दिवशी मिटविल्याने खऱ्या अर्थाने लाटगाव ग्रामस्थांची संक्रांत गोड झाली आहे.
शंकर बाळू कांबळे, आप्पा सटू कांबळे व अन्य दलित बांधवांनी ८ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपल्याला बहिष्कृत टाकल्याची तक्रार केली होती. गेली २० वर्षे दलित समाजावर सवर्णांकडून अत्याचार होत आहेत. याप्रकरणी कारवाईची मागणी केली होती.
हे प्रकरण सामंजस्याने मिटविले जावे, असे गावातील सर्वच समाजातील लोकानांही वाटत होते. मात्र, पुढाकार कुणी घ्यायचा? असा प्रश्न होता. दरम्यान, हे प्रकरण जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने घेतले. तहसीलदार ठोकडे यांनी ग्रामदैवत नागनाथ मंदिरात ग्रामस्थांची बैठक बोलावली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतले. यावेळी तक्रारदारांच्या मुद्यांवर चर्चा झाली. ज्येष्ठ व प्रमुख मंडळींना बोलण्याची संधी दिली. सर्वांना समज देताना तहसीलदार ठोकडे यांनी दोन्ही बाजंूकडील प्रमुख मंडळींची समजूत काढली. त्यानंतर दलित-सवर्ण लोकांनी एकमेकाला तीळगूळ देऊन एकोप्याने राहण्याचा निर्धार केला.
चर्चेत मारुती कांबळे, शंकर कांबळे, गणपती कांबळे, बाळू कांबळे, नंदकुमार सरदेसाई, विजय चौगुले, व्यंकटराव सरदेसाई, प्रकाश सरदेसाई, आदींनी सहभाग घेतला. या बैठकीस एस. एस. भोसले, किरण खटावकर, म्हाळसाकांत देसाई, तलाठी महादेव देसाई, सरपंच कल्याणी सरदेसाई, रणजित पाटील, उत्तम कांबळे, जानबा कांबळे, शिवाजी कांबळे व ग्रामस्थ उपस्थित होते.
मनावरचं ओझं कमी झालं..!
आपापसांतील वादामुळे लाटगावात दोन समाजातील वाद थांबण्याची चिन्हे नव्हती. आज हा वाद मिटल्याने मनावरचे ओझे कमी झाले आहे, अशी प्रतिक्रिया जानकुबाई कांबळे या महिलेने दिली.