...अन् गोलकिपर सामना सोडून गेला

By Admin | Updated: December 9, 2014 00:57 IST2014-12-09T00:52:56+5:302014-12-09T00:57:48+5:30

यांनी घडविला कोल्हापूरचा फुटबॉल...

... and the goalkeeper left the match | ...अन् गोलकिपर सामना सोडून गेला

...अन् गोलकिपर सामना सोडून गेला

 साधारण १९५१ ते १९५३ चा काळ. प्रॅक्टिस क्लब विरुद्ध बालगोपाल तालीम मंडळ यांचा सामना पूर्वीच्या रावणेश्वर तळ्यात म्हणजेच आताच्या शाहू स्टेडियममध्ये सुरू होता. या सामन्यात ‘बालगोपाल’कडून खेळणाऱ्या लक्ष्मण पिसे यांनी ऐन रंगात आलेल्या चुरशीच्या सामन्यात गोल नोंदवला अन् प्रॅक्टिसचे गोलरक्षक रामभाऊ कदम गोल झाल्यानंतर सामना सोडून गेले. हा किस्सा बालगोपाल तालमीचे ज्येष्ठ फुटबॉलपटू लक्ष्मण पिसे हे या आठवणीतील फुटबॉलच्या सामन्याविषयी सांगत आहेत. या काळात बालगोपाल तालीम मंडळ व शिवाजी तरुण मंडळ यांच्यातच जास्तीत जास्त सामने ईर्ष्येने होत असत. वडील गोपालराव पिसेही बाराईमाम तालमीकडून सामने खेळायचे. आमच्या बालगोपाल तालमीच्या परिसरात क्रिकेट, फुटबॉल त्याचबरोबर कुस्तीचे वेड सर्व नागरिकांना होते. यातच मला फुटबॉलची गोडी लागली. सडपातळ असल्याने चपळाईने मी चेंडू पळवत असे. त्यामुळेच माझी निवड बालगोपाल तालीम मंडळाकडून झाली. याचदरम्यान अमर शिल्ड रावणेश्वर तळ्यात व्हायचे. येथे आमची गाठ प्रॅक्टिस क्लबबरोबर पडली. प्रॅक्टिस नावाजलेला संघ, त्याचे खेळाडूही चपळ, आक्रमक. या सामन्यात रामभाऊ कदम ‘प्रॅक्टिस’कडून गोलरक्षण करण्यास उभे राहिले. मी स्ट्रायकर म्हणून खेळताना पहिल्या हाफमध्येच ‘प्रॅक्टिस’वर एक गोल केला. डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच मी उजव्या कोपऱ्यातून मारलेला चेंडू सरपटत गोल जाळ्यात गेला. त्यामुळे नावाजलेले गोलकिपर असणाऱ्या रामभाऊ कदमांना आपण गोलरक्षण करण्यास कमी पडलो म्हणून राग आला आणि ते तडक मैदान सोडून गेले. खेळातील चपळाई बघून गोखले कॉलेजमध्ये शिकत असताना तत्कालीन पुणे विद्यापीठाच्या संघातून माझी व राजाराम कॉलेजच्या मानसिंग जाधव यांची निवड झाली. पुढे पुणे विद्यापीठाकडून खेळताना मुंबई विद्यापीठ विरोधात आक्रमक वेगवान खेळाचे प्रदर्शन केले. १९५३ साली के.एस.ए.च्या संघाकडून रोव्हर्स कप खेळण्यासाठी निवड झाली. या सामन्यात मुंबईतील अनेक संघांना पाणी पाजले. अनवाणी खेळत असल्याने तळपायाला अनेक ठिकाणी जखमा होत असत. सांगली येथे राजूभाई शिल्डचे सामने होत असत. यामध्ये ‘बालगोपाल’चा संघही भाग घेत असे. घरातून दोन दिवसांची भाकरी बांधून आम्ही खेळायला जात असू. याच स्पर्धेत एका दिवसात निकाल न लागल्याने हुबळीविरुद्ध दोन दिवस सामना खेळावा लागला. त्यात आमची १-० अशी हार झाल्याची आठवण त्यांनी यावेळी बोलून दाखवली. त्याकाळी तालमीचा पराभव झाला की, परिसरातील नागरिकांना झोप लागत नसे, कारण सर्व नागरिक संघाला प्रोत्साहन देण्यासाठी मैदानात हजर असत. याच फुटबॉलमुळे मला कागलकर सरकारांच्या कोल्हापूर इलेक्ट्रीकल सप्लाय कंपनीत नोकरी लागली. १४ वर्षे फुटबॉल खेळलो. फुटबॉलबरोबर राष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतही चमकदार कामगिरी केल्याचा आवर्जून उल्लेख केला. आताच्या खेळाडूंना सर्वाधिक सोयीसुविधा असूनही कोल्हापूरचा फुटबॉल राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर पोहोचला नसल्याची खंतही त्यांनी व्यक्त केली. - शब्दांकन : सचिन भोसले

Web Title: ... and the goalkeeper left the match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.