...अन् पानसरेंच्या जिवावर बेतले
By Admin | Updated: April 4, 2015 00:04 IST2015-04-03T21:58:18+5:302015-04-04T00:04:48+5:30
बी. जी. कोळसे-पाटील : गारगोटीत आनंदराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित कार्यक्रम

...अन् पानसरेंच्या जिवावर बेतले
गारगोटी : शब्द प्रामाण्यवाद संपविण्यासाठी चार्वाकापासून संतश्रेष्ठ तुकाराम ते नरेंद्र दाभोलकरपासून पानसरेंपर्यंत सर्वांची हत्या आजअखेर सुरू असून, पानसरेंनी करकरेंच्या हत्येचे मूळ शोधण्याचा केलेला प्रयत्नच त्यांच्या जिवावर बेतला, असे परखड मत मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश बी. जी. कोळसे-पाटील यांनी व्यक्त केले. ते गारगोटी येथे इंजुबाई सभागृहात कॉ. आनंदराव मोरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या ‘कॉ. गोविंदराव पानसरे यांचे खरे खुनी कोण?’ या विषयावरील व्याख्यानप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी आमदार श्रीपतराव शिंदे होते.यावेळी कोळसे-पाटील म्हणाले, ब्राह्मण्यवादाचे पुरस्कर्ते असणाऱ्या महात्मा गांधींनी स्वातंत्र्याची चळवळ बहुजनांच्या हातात दिल्याच्या रागातून गोडसे प्रवृत्तीने त्यांची हत्या केली, तर करकरे यांनी मालेगावसह राज्यातील बॉम्बस्फोटांच्या मुळाशी जाऊन खरे सूत्रधार बाहेर काढल्यानेच नियोजनबद्धरीत्या त्यांची हत्या केली. धर्मांध शक्तींना बहुजनांबरोबरच देशावरही सत्ता अबाधित ठेवायची असल्यानेच त्यांच्या विचारांच्या आडवे येणाऱ्यांची हत्या होत आहे. विचारांची लढाई बंदुकीच्या गोळीने संपत नसून, त्यातून नव्या विचारांचे कार्यकर्ते जन्मास येत आहेत. हे धर्मांध शक्तीने लक्षात घ्यावे.
यावेळी अध्यक्षीय भाषणात माजी आमदार श्रीपतराव शिंदे म्हणाले, नथुरामाच्या विचारांच्या लोकांनी दाभोलकर, पानसरेंचा खून केला. पानसरेंबद्दल केवळ भाषणे करून न थांबता त्यांच्या विचारांचा जागर केला पाहिजे.
कार्यक्रमाला माजी आमदार बजरंग देसाई, प्रा. बाळ देसाई, सरपंच छाया सारंग, वसंतराव देसाई, मधुआप्पा देसाई, भाऊसाहेब देसाई, गोपाळ कांबळे, पी. एस. कांबळे, डॉ. आर. एस. कांबळे यांच्यासह मान्यवर व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समारंभाचे संयोजन आनंद बहुद्देशीय सामाजिक संस्थेने केले होते. कॉ. बाबूराव निंबाळकर यांच्या हस्ते मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. छाया मोरे यांनी प्रास्ताविक केले. पाहुण्यांचा परिचय ज्येष्ठ साहित्यिक डॉ. राजन गवस यांनी करून दिला. व्ही. जे. कदम यांनी सूत्रसंचालन, तर कॉ. व्यंकट मोरे यांनी आभार
मानले.