‘आनंदवन’ला दातृत्वाची ऊब

By Admin | Updated: August 25, 2015 00:06 IST2015-08-25T00:04:50+5:302015-08-25T00:06:24+5:30

जिल्ह्यातून प्रतिसाद : ३६८ जणांकडून कपडे दान; ७० बॉक्स संकलित

'Anandvan' boredom of the toothache | ‘आनंदवन’ला दातृत्वाची ऊब

‘आनंदवन’ला दातृत्वाची ऊब

कोल्हापूर : ‘जुने कपडे देऊया, आनंदवन फुलवूया’ अशी भावनिक हाक देत एक सामाजिक उपक्रम म्हणून जिल्हा परिषदेने सुरू केलेले जुने व नवे कपडे संकलित करण्याच्या उपक्रमाला कोल्हापूरकरांनी दातृत्वाची ऊब दिली आहे. गेल्या सात दिवसांत जिल्ह्यातून ३६८ दानशूर लोकांनी कपडे दान केले आहेत. आतापर्यंत मोठे ७० बॉक्स भरले आहेत. दातृत्वाचा अक्षरश: वर्षाव सुरू असल्यामुळे दिलेले कपडे ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेला जागेचा शोध घ्यावा लागत आहे.
वर्धा जिल्ह्यातील वरोड्याजवळ बाबा आमटे यांनी १९५२ मध्ये ‘आनंदवन’ची स्थापना केली. सध्या ते साडेतीन हजार कुष्ठरोग्यांचे घर बनले आहे तेथील कुष्ठरोग्यांसाठी कपडे दान करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद देऊन कर्मचारी संघटना व जिल्हा परिषदेच्या प्रशासनाने पुढाकार घेतला. ‘आनंदवनासाठी मदत करा,’ असे आवाहन करणारे लक्षवेधी फलक कार्यालयात दर्शनी भागात लावले आहेत. नवीन, जुने कपडे व अन्य साहित्य संकलित करण्यासाठी कार्यालयाच्या इमारतीमध्ये १७ आॅगस्टपासून व्यवस्था केली आहे. दुसऱ्या दिवसापासूनच कपडे दान करण्यासाठी ओघ वाढला. जिल्हा परिषदेतील विविध विभागांतील जिल्ह्यातील कर्मचारी, लोक दान करत आहेत. दान केलेले कपडे ठेवण्यासाठी बॉक्स अपुरे पडत आहेत.
शहर, परिसर आणि जिल्ह्यातून ३६८ जणांनी कपडे दान केल्याची नोंद वहीत स्वत:हून केली आहे. सोमवारी दिवसभर जीर्ण कपडे, फाटलेले कपडे बाजूला काढण्याचे काम सुरू होते. स्वच्छ, ड्रायक्लिनिंग व इस्त्री केलेले कपडे ‘आनंदवन’ला पाठविण्यासाठी बॉक्समध्ये पॅकिंग करण्यात आले.
एका दिवसात ७० बॉक्स भरले आहेत. पंचायत समितीमध्ये संकलित झालेले कपडे आजपासून जिल्हा परिषदेकडे आणण्यात येणार आहे. ३१ आॅगस्टपर्यंत मुदत असल्याने शंभरापेक्षा अधिक बॉक्स संकलित होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. (प्रतिनिधी)

 

Web Title: 'Anandvan' boredom of the toothache

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.