कोरोनावर प्राणायामाची मात्रा (नियोजनातील विषय, डमी पाठवत आहे.)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:25 IST2021-05-12T04:25:15+5:302021-05-12T04:25:15+5:30
कोल्हापूर : कोरोना संसर्ग होऊ नये व झाल्यास त्याच्याशी लढा देण्यात प्राणायाम ही सर्वांत महत्त्वाची मात्रा ठरली आहे. आयुर्वेद ...

कोरोनावर प्राणायामाची मात्रा (नियोजनातील विषय, डमी पाठवत आहे.)
कोल्हापूर : कोरोना संसर्ग होऊ नये व झाल्यास त्याच्याशी लढा देण्यात प्राणायाम ही सर्वांत महत्त्वाची मात्रा ठरली आहे. आयुर्वेद या भारतीय जीवनशैलीने कोरोनासारख्या जागतिक आजाराशी लढण्यासाठी मोठी ताकद दिली असून, यामुळे शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढते, फुफ्फुसाची क्षमता व रोगप्रतिकारशक्ती वाढते. योगा आणि प्राणायाम आता सर्वसामान्यांनाही जगण्याचा भाग बनवावा लागणार आहे.
गेल्या वर्षीपासून जगभराला वेठीस धरलेल्या कोरोनाने आरोग्यदायी जीवनशैलीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. या काळात शरीरातील ऑक्सिजन आणि फुफ्फुसाची कार्यक्षमता किती महत्त्वाची असते याची जाणीव प्रत्येकाला झाली. गेल्या महिनाभरापासून संसर्गाची दुसरी लाट सुरू असून, वेगाने माणसाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे. त्यामुळे कमी कालावधीतच रुग्ण गंभीर स्थितीला जातो. सध्या जिल्ह्यात अडीच हजारांवर रुग्ण व्हेंटिलेटर व ऑक्सिजनवर आहेत. वातावरणात मुक्त असलेला ऑक्सिजन मिळविण्यासाठी आता मारामार सुरू आहे आणि दुर्दैव असे की, व्हेंटिलेटर-ऑक्सिजन बेडअभावी रुग्णांचा मृत्यू हाेत आहे.
भोवतालच्या या गंभीर वातावरणातदेखील स्वत:ला तंदुरुस्त आणि सकारात्मक ठेवायचे असेल तर योगा आणि प्राणायामाला पर्याय नाही. त्यामुळे कोरोनासारख्या संकटातही सुरक्षित राहायचे असेल तर त्यातून सकारात्मकरीत्या बाहेर यायचे असेल तर योगा-प्राणायाम, ध्यानधारणा हीच जीवनशैली बनवावी लागेल.
--
प्राणायामाचे फायदे
-दैनंदिन जीवनात श्वासोच्छ्वास करताना फुफ्फुसाचा पूर्णक्षमतेने वापर होत नाही, त्यामुळे काही पेशी निद्रिस्त राहतात. श्वासाचे व्यायाम केल्याने हे निद्रिस्तपेशी सुद्धा कार्यान्वित होतात.
-अनुलोम, विलोम, भस्रिका, भांबरी प्राणायाम, उदगीत प्राणायाम, कपालभाती या प्राणायामांमुळे कमी-जास्त वेगाने श्वासोच्छ्वास होतो. शरीरातील कार्बनडाय ऑक्साईड शरीराबाहेर फेकला जातो. फुफ्फुसाची कार्यक्षमता वाढते. रोगप्रतिकारशक्ती वाढते.
-योगा-प्राणायामाने मनातील नकारात्मक विचार कमी होऊन आपल्यात सकारात्मकता येते, मन शांत राहते.
-रक्तप्रवाह, पचनक्षमता सुरळीत करतो, शरीराची लवचिकता वाढते. आत्मविश्वास वाढून विचार अधिक स्पष्ट होतात.
--
आता कोरोनामुळे लोकांना योगा-प्राणायामाचे महत्त्व लक्षात आले असले तरी ही आपली जीवनशैली आहे. याचे नियमित आचरण केल्याने हृदयरोग, उच्चरक्तदाब, डोकेदुखी असे आजार कमी होतात. काहीवेळ ध्यानस्त बसल्याने विचारांची बैठक वाढते. त्यातही सूर्यनमस्कार सर्वांनी आवर्जून घातले पाहिजे.
सूर्यकांत गायकवाड
योगप्रशिक्षक
--
श्वास हा योगाभ्यासामधला एक भाग आहे. सुदर्शन क्रिया, योगा, ध्यान-प्राणायामाचा मुख्यत्वे परिणाम हा मनावर आणि मेंदूवर होतो. नकारात्मकता, ताणतणाव, दैनंदिन जीवनातील संघर्ष, भीतीमुळे मानसिक खच्चीकरण होते. त्याचा परिणाम शरीरावर होतो. या सगळ्यांशी लढण्याची ताकद प्राणायाम देते.
विनायक मुरदंडे
योगप्रशिक्षक, आर्ट ऑफ लिव्हिंग
--
मी योगा करत नव्हते त्यावेळी चिडचिड व्हायची, मानसिक अस्वस्थ व्हायचे. मात्र गेल्या दोन-तीन वर्षांत योगा-प्राणायाम करायला लागल्यापासून माझ्या स्वभावात खूप फरक पडला. विचारांमधील सकारात्मकता माझ्या दैनंदिन वागण्यात, व्यवहारातही दिसू लागली. मन शांत झालं.
ऐश्वर्या पोवार.
---
चालणं हा माझा नित्यक्रम होताच, प्राणायामाचे महत्त्व कळाल्यापासून तेदेखील सुरू केले. त्याचा खूप चांगला परिणाम मला जाणवला. तब्येतीच्या तक्रारी कमी झाल्या, दिवसभर मी फ्रेश असतो. शरीर-मनाची ताकद वाढली आहे. कितीही ताणतणाव असले तरी मी त्याचा शांततेने प्रश्न सोडवू शकतो.
दीपक हावळ
--