कोल्हापूर : उच्चशिक्षित असूनही आदिवासींसाठी उभे आयुष्य वेचणाऱ्या पद्मश्री डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांच्या कार्यापुढे ‘भारतरत्न’सुद्धा फिका आहे. समर्पित आयुष्य कसे जगावे, याची अनुभूती घेण्यासाठी आयुष्यात एकदा तरी ‘हेमलकसा’ला भेट द्या, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी केले. येथील जिनधर्म माता शालिनीदेवी चिंतामणी कापसे मानव धर्म सेवा प्रतिष्ठान आणि हृदयस्पर्श हौशी सांस्कृतिक व्यासपीठातर्फे भगवान महावीर मानवधर्म अहिंसा गौरव पुरस्कार आमटे दाम्पत्याला पाटेकर यांच्या हस्ते रविवारी देण्यात आला. श्री १००८ भगवान महावीर जन्मदिन समारोहानिमित्त शाहू स्मारक येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. पाटेकर म्हणाले, हेमलकसाशी माझा संबंध पूर्वीपासूनचा आहे. आमटे दाम्पत्य तिथे सुरुवातीला गेले तेव्हाची परिस्थिती आणि आताची परिस्थिती यात प्रचंड फरक आहे. जमिनीला नांगर लावण्यास घाबरणारा आदिवासी आज शिक्षित झाला आहे, याचे श्रेय डॉ. प्रकाश आणि मंदाकिनी आमटे यांनी तिथे केलेल्या प्रचंड परिश्रमाला जाते. मला हेमलकसा येथील कार्यावर आधारित चित्रपटात काम करता आले, हे माझे भाग्य आहे. पाटेकर म्हणाले, जेव्हा जेव्हा मी हेमलकसाला भेट देतो तेव्हा मी किती लहान आहे, याची जाणीव मला होते म्हणून हेमलकसा मला सुरक्षित वाटतो. शहरात राहणारी आमच्यासारखी माणसे जंगल परिसरात मधुचंद्रालाही केवळ दहा ते बारा दिवस राहू शकतात, पण आमटे दाम्पत्याने आदिवासींसाठी आपले आयुष्यच जंगलात व्यतीत केले आहे. आज आमटे कुटुंबाची तिसरी पिढी आदिवासींसाठी वैद्यकीय सेवा देत आहे याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे. सहज खर्च होणारा पैसा हेमलकसासारख्या विधायक प्रकल्पांना देण्यासाठी समाजाने यावे. त्यानंतर झालेल्या मुलाखत सत्रात डॉ. प्रकाश आमटे, मंदाकिनी आमटे यांनी हेमलकसामधील ‘आमटे आर्ट’चा प्रवास उलगडला. डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, सुरुवातीला हेमलकसा इथे गेलो तेव्हा अनेक अडचणी आल्या. अनेक आदिवासी भुकेसाठी किडे-मुंग्याही खात होते. प्राण्यांना मारत होते. त्यामुळे त्यांना प्राण्यांवर प्रेम करणे शिकविणे गरजेचे होते. यासाठी त्यांना शिकारीदरम्यान प्राण्यांची जी पिल्ले सापडत होती, ती आमच्याकडे घेतली. यासाठी त्यांना अन्नधान्य देऊन घेऊ लागलो. त्याची सुरुवात माकडाच्या पिल्लापासून झाली. त्यातूनच हळूहळू आमचे घर रुग्णांसाठी दवाखाना आणि वन्यप्राण्यांसाठी घर झाले. युवकांच्या समाजसेवेतील सहभागाविषयी बोलताना डॉ. आमटे म्हणाले, आजही हेमलकसामध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेल्या स्वयंसेवकांची संख्या वाढत आहे. निराशेचे चित्र नाही. डॉ. मंदाकिनी आमटे म्हणाल्या, वैद्यकीय शिक्षणानंतर गांधी मेडिकल कॉलेजमध्ये १९७२ मध्ये काम करताना डॉ. प्रकाश आमटे यांच्याशी ओळख झाली, ओळखीचे रूपांतर प्रेमात आणि विवाहात झाले. वैद्यकीय शिक्षणावेळी बाबा आमटेंच्या कार्याची माहिती नव्हती, पण ‘आनंदवना’त गेल्यानंतर तेथील काम पाहून काहीतरी वेगळे करण्याच्या दृष्टिकोनातून आनंदवनमध्ये काम करण्यास सहमती दिली. पण, आम्हाला काम हेमलकसामध्ये करावे लागले. झोपडीवजा घरात आम्ही राहत होतो. वैद्यकीय सेवा देण्यासाठी आदिवासींचा विश्वास संपादन करणे हे आमच्यापुढील आव्हान होते; पण आम्ही हे आव्हान स्वीकारले व त्यात यशस्वी झालो. दिग्दर्शक अॅड. समृद्धी पोरे म्हणाल्या, हेमलकसा येथील आमटे दाम्पत्याचे काम पुस्तकांमधून वाचले होते. येथील कामाच्या चित्रफितीची माहिती नेटवरून मिळाल्यानंतर हेमलकसा येथे जाण्याचा मोह आवरला नाही. उच्चशिक्षित असूनही जंगलात आदिवासींसाठी काम करणारे डॉ. प्रकाश आणि मंदाताई आमटे यांचे कार्य जगाला प्रेरणा देणारे आहे. प्रा. वैजनाथ महाजन, समीर देशपांडे, प्रा. प्रभाकर तांबट यांनी मुलाखतकार म्हणून काम पाहिले. याप्रसंगी हेमलकसासाठी स्वाती शेटे आणि करण एजन्सी यांनी प्रत्येकी ५१ हजार रुपये, रसूल मोमीन यांनी २५ हजार, पृथ्वीराज चव्हाण यांनी ११ हजार, तर मदन भंडारी यांनी १५ हजारांची मदत केली. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, राज्य सैनिक लीगचे उपाध्यक्ष कॅप्टन एन. एन. पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. हृदयस्पर्शी हौशी सांस्कृतिक व्यासपीठाचे अध्यक्ष पद्माकर कापसे यांनी स्वागत केले. पद्मिनी कापसे यांनी मानपत्राचे वाचन केले. यावेळी चाटे शिक्षण समूहाचे कोल्हापूर विभागीय संचालक प्रा. भारत खराटे, वैशाली क्षीरसागर, शरद शेटे, स्वाती शेटे, अनिल बागणे, प्रभाचंद्र शास्त्री, अजित पाटील, फुलचंद जैन, अनिल जाधव, अजित आजरी, जयेश ओसवाल, जयेशभाई कदम, एन. एन. पाटील, आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
आमटे कुटुंबाच्या कार्यापुढे ‘भारतरत्न’ही फि का
By admin | Updated: April 6, 2015 01:13 IST