आंबोली गर्दीने फुलली
By Admin | Updated: July 27, 2015 00:27 IST2015-07-27T00:12:30+5:302015-07-27T00:27:51+5:30
धबधबे ओसंडले : वाहतूक कोंडी; हजारो पर्यटकांची हजेरी

आंबोली गर्दीने फुलली
आंबोली : जोरदार पावसाने आंबोलीतील सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे रविवारी आंबोलीचे वर्षा पर्यटन हाऊसफुल्ल झाले होते. धबधब्यावर पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला होता. रविवारी आंबोलीत दिवसभरात सुमारे ३० ते ३५ हजार पर्यटकांनी हजेरी लावली होती. आंबोलीत तीनही सत्रात वाहतूक कोंडी झाली होती. मात्र, पोलिसांनी गर्दीवर नियंत्रण मिळवत ही कोंडी दूर केली.आंबोलीत मुसळधार पाऊस कोसळत असून, सर्व धबधबे ओसंडून वाहत आहेत. त्यामुळे गोवा, कर्नाटक तसेच सिंधुदुर्गमधील पर्यटकांनी एकच गर्दी केली होती. सकाळपासून आंबोली पर्यटकांनी फुलून गेली होती. जिकडे तिकडे वाहने व पर्यटकांची गर्दी पाहायला मिळत होती. त्यामुळेही गर्दीला आवर घालत असताना पोलिसांनाही किरकोळ लाठीचा वापर करावा लागत होता. मुख्य धबधब्यानजीक पोलीस योग्य पद्धतीने बंदोबस्त हाकत असतानाच इतर ठिकाणी मात्र गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात पोलिसांना अपयश येत होते. अनेक ठिकाणी तर केवळ दोन वाहतूक पोलीस वाहतूक कोंडी दूर करीत होते. स्टॉलधारकांनी पर्यटकांसाठीच्या पार्किंगस्थळावर वाहने उभी केल्याने पर्यटकांना अडथळे निर्माण होत होते. दरम्यान, मद्यपान करून वाहने चालविणाऱ्या चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. उशिरापर्यंत थांबणाऱ्या पर्यटकांना पोलिसांनी चांगलाच मज्जाव केला होता. (वार्ताहर) (छायाचित्र पान ३ वर)
सावडाव धबधब्यावर बाचाबाची
कणकवलीनजीक सावडाव धबधब्यावरही रविवारी गर्दी झाली होती. पाऊस चांगला झाल्याने धबधबा पाण्याने ओसंडून वाहत आहे. मात्र, येथे वादावादीचे प्रकार नित्याचे झाले आहेत. रविवारी कुडाळ आणि कणकवली येथील युवकांच्या दोन गटांत बाचाबाचीचा प्रसंग उद्भवला, परंतु त्यातीलच काहींनी मध्यस्थी करत यावर पडदा टाकला. येथे सुटीच्या दिवशीही पोलीस बंदोबस्त ठेवण्याची मागणी होत आहे.