अंबील यात्रा उत्साहात

By Admin | Updated: January 3, 2016 00:29 IST2016-01-03T00:29:01+5:302016-01-03T00:29:01+5:30

भाविकांची अलोट गर्दी : नैवेद्य स्वतंत्र स्वीकारल्याने अन्नाची नासाडी टळली

Ambal travel enthusiast | अंबील यात्रा उत्साहात

अंबील यात्रा उत्साहात

कोल्हापूर : ‘उदं गं आई उदं’चा गजर, भंडाऱ्याची उधळण, पालखी सोहळा, देवीची पारंपरिक सालंकृत पूजा, वडी भाजी, वांग्याची भाजी, भाकरी, अंबीलचा नैवेद्य, आरती, मानाच्या जगांपुढे नतमस्तक होत शनिवारी ओढ्यावरील रेणुका देवीची अंबील यात्रा उत्साहात झाली. नैवेद्य स्वीकारण्यासाठी केलेल्या स्वतंत्र व्यवस्थेला भाविकांकडून उत्तम प्रतिसाद मिळाला. भाविकांनी येथेच स्नेहभोजनही केले.
सौंदत्ती डोंगरावरील यात्रेनंतर आठ दिवसांनी ओढ्यावरील रेणुका देवीची शनिवारी यात्रा झाली. यानिमित्त पहाटे तीन वाजता अभिषेक करून देवीची सालंकृत पारंपरिक पूजा बांधण्यात आली. पुजारी सुनील मेढे, मदनआई जाधव यांनी रेणुका, परशुराम व जमदग्नी ऋषी यांना अभिषेक घालून श्री रेणुकेच्या प्रति सौंदत्ती रूपातील विशेष अलंकार पूजा बांधली. यानंतर नव्या राजवाड्यातून श्रीमंत छत्रपती घराण्याकडील पहिला मानाचा नैवेद्य देवीला अर्पण करण्यात आला. पहाटे पाच वाजता पहिली आरती झाली. दुपारी चार वाजता देवीची सवाद्य आरती करण्यात आली. आरतीनंतर देवीची सुती चौंडके, हलगी अशा वाद्यांच्या गजरात पालखी काढण्यात आली. यामध्ये मंदिराला पाच प्रदक्षिणा घालण्यात आल्या. दरम्यान, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून मंदिरात जाण्याआधीच देवीचा व पालखीचा नैवेद्य स्वीकारला जात होता. हा नैवेद्य मागच्या बाजूने भाविकांना पुन्हा प्रसाद म्हणून देण्यात येत होता. मैदानात मागील बाजूला बांधलेल्या मांडवात मानाचे तीन जग ठेवले होते. येथेही भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. नैवेद्य दाखवल्यानंतर परिसरातच बसून सहकुटुंब भोजनाचा आस्वाद भाविक घेत होते. रात्री मदनआई शांताबाई जाधव (ओढ्यावरील जग), बायाक्काबाई चव्हाण (रविवार पेठ जग), लक्ष्मीबाई चंद्राबाई जाधव (गंगावेश जग) या जगांचे आपआपल्या ठिकाणी प्रस्थान झाले. (प्रतिनिधी)

Web Title: Ambal travel enthusiast

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.