अंबाबाईचा शालू लिलाव तहकूब
By Admin | Updated: December 9, 2015 01:54 IST2015-12-09T01:43:23+5:302015-12-09T01:54:16+5:30
साडेपाच लाख सरकारी किंमत : उच्चांकी दरामुळे भाविक नाराज

अंबाबाईचा शालू लिलाव तहकूब
कोल्हापूर : पाच लाख ४२ हजार रुपये अशा उच्चांकी सरकारी दरामुळे श्री अंबाबाई देवीचा शालू लिलाव मंगळवारी तहकूब केला. आजपर्यंतचा शालूचा हा सरकारी दर उच्चांकी असल्याच्या प्रतिक्रिया भाविकांमधून उमटल्या. शारदीय नवरात्रौत्सवावेळी तिरूपतीहून श्री अंबाबाई देवीला आलेला हा शालू यामुळे कोणी खरेदी केला नाही. आग्रा, इचलकरंजीसह नऊ भाविक लिलावासाठी आले होते.
श्री अंबाबाईसाठी तिरूपतीहून दरवर्षी शारदीय नवरात्रौत्सवावेळी शालू (महावस्त्र) येतो. मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास गरुड मंडपात या शालू लिलावाला पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्य संगीता खाडे, सदस्य प्रमोद पाटील यांच्या उपस्थितीत सुरुवात झाली. यावेळी व्यवस्थापक धनाजी जाधव यांनी लिलावात ज्यांनी भाग घेतला, त्या भक्तांची नावे सांगितली.
लिलावामध्ये राम उष्माण्णा आडके (इचलकरंजी), प्रभाकर पीरगोंडा पाटील, जयकुमार बाबूराव काडाप्पा (इचलकरंजी), अनिल राजहंस पोळ, बाळासाहेब निकम, श्रीधर श्रीपतराव शिंदे, सूरज भाटिया, संगीता पोळ (कोल्हापूर), नितीन गुप्ता या नऊजणांचा समावेश होता.
सहसचिव शिवाजी साळवी यांनी लिलाव प्रक्रियेला सुरुवात केली. या लिलावासाठी अर्ध्या तासाचा वेळ दिला. पण उच्चांकी सरकारी दरामुळे प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर हा लिलाव तहकूब झाल्याचे साळवी यांनी जाहीर केले. यावेळी व्हॅल्युएटर पुरुषोत्तम काळे उपस्थित होते.