जयघोषात ‘अंबाबाई’चा रथोत्सव
By Admin | Updated: April 5, 2015 00:37 IST2015-04-05T00:37:44+5:302015-04-05T00:37:44+5:30
चांदीच्या रथामधून नगरप्रदक्षिणा

जयघोषात ‘अंबाबाई’चा रथोत्सव
कोल्हापूर : आकर्षक रांगोळी, फुलांच्या पाकळ्यांचा गालिचा, ‘अंबा माता की जय’चा अखंड गजर, हजारो भाविकांची उपस्थिती आणि चांदीच्या रथात विराजमान झालेली अंबाबाईची उत्सवमूर्ती... अशा मंगलमय वातावरणात शनिवारी रात्री करवीरनिवासिनी श्री अंबाबाईची चांदीच्या रथामधून नगरप्रदक्षिणा पार पडली.
दख्खनचा राजा जोतिबाच्या चैत्र यात्रेच्या दुसऱ्या दिवशी अंबाबाईचा रथोत्सव साजरा केला जातो. शनिवारी सायंकाळी पाच वाजल्यापासून रथोत्सव सोहळ्याची तयारी सुरु होती. सायंकाळी आठनंतर नगरप्रदक्षिणेच्या मार्गावर भाविकांची अलोट गर्दी होऊ लागली. रात्री पावणेदहाला फुलांनी सजविलेल्या चांदीच्या रथात देवीची उत्सवमूर्र्ती विराजमान झाली. तोफेची सलामी दिल्यानंतर ‘अंबा माता की जय’च्या जयघोषात रथोत्सवाला सुरुवात झाली. याप्रसंगी आमदार राजेश क्षीरसागर, देवस्थान समितीच्या सचिव शुभांगी साठे, सदस्या संगीता खाडे यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती. देवीच्या रथापुढे मानाचा घोडा होता. परंपरागत वाद्यांच्या गजरात अंबाबाई मंदिर येथून रथोत्सवाला प्रारंभ झाला. यावेळी ठिकठिकाणची पुष्पवृष्टी आणि नेत्रदीपक आतषबाजीमुळे वातावरण प्रसन्न झाले.
महाद्वार चौक, महाद्वार रोडमार्गे रथ पुढे गुजरी कॉर्नर येथे आला. येथे आकर्षक लेसर दिव्यांवर अंबाबाईचा महिमा दाखविण्यात येत होता. गुजरी, भाऊसिंगजी रोडवरील मार्गांवर आकर्षक रांगोळी काढण्यात आली होती. भवानी मंडपमार्गे तुळजाभवानी मंदिरासमोर आल्यानंतर देवीची आरती करण्यात आली. पुढे एम.एल.जी. गर्ल्स हायस्कूल येथे महालक्ष्मी स्पोर्टस्च्यावतीने रस्त्यावर शेणाने सारवून त्यावर आकर्षक रांगोळी काढली होती. मिरजकर तिकटी येथे सणगर गल्ली तालीम मंडळ व रायगड कॉलनी मित्रमंडळाच्यावतीने शिव - पार्वतीसह, अंबाबाईचा आकर्षक देखावा केला होता. नगरप्रदक्षिणा मार्गावर ठिकठिकाणी प्रसादाचे वाटप करण्यात येत होते; तर ठिकठिकाणी सुवासिनी रथाची आरती करीत होत्या.
एम. एल.जी. गर्ल्स हायस्कूल मार्ग, बालगोपाल तालीम मंडळ, मिरजकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिरमार्गे महाद्वार रोड मार्गे अंबाबाई मंदिर येथे रथोत्सवाची सांगता झाली. नगरप्रदक्षिणा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ठिकठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)