शुक्रवारपासून अंबाबाईचे महाद्वार उघडणार;

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:24 IST2020-12-31T04:24:56+5:302020-12-31T04:24:56+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. ...

Ambabai's entrance will open from Friday; | शुक्रवारपासून अंबाबाईचे महाद्वार उघडणार;

शुक्रवारपासून अंबाबाईचे महाद्वार उघडणार;

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे शुक्रवारपासून करवीरनिवासिनी श्री अंबाबाई मंदिराचे महाद्वार उघडण्यात येणार आहे. त्यामुळे भाविकांना गरुड मंडप, गणपती मंडप येथे येऊन देवीचे मुखदर्शन घेता येईल. दर्शनाची वेळदेखील एक तासाने वाढवली असून सकाळी सहा ते रात्री आठ या वेळेत भाविकांना देवीचे दर्शन घेता येणार आहे. तसेच मंदिर आवारातील दुकाने उघडण्यासही परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

समितीच्या शिवाजी पेठ येथील कार्यालयात अध्यक्ष महेश जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीस कोषाध्यक्षा वैशाली क्षीरसागर, सदस्य शिवाजीराव जाधव, राजू जाधव, सचिव विजय पोवार यांच्यासह मंदिर आवारातील दुकानदार व पदाधिकारी उपस्थित होते. कोरोनाबाबतची खबरदारी म्हणून अंबाबाई मंदिराचे दोन दरवाजे सध्या बंद आहेत. पण महाद्वारातून देवीचे मुख दर्शन घेणाऱ्यांची संख्या मोठी आहे. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसापासून महाद्वार उघडण्यात येणार आहे. येथून येणारे भाविक गरुड मंडप व गणपती मंडप येथून अंबाबाईचे मुखदर्शन घेऊन पुन्हा महाद्वारातून बाहेर जातील. दर्शनाव्यतिरिक्त अन्य कारणासाठी भाविकांना मंदिर आवारात थांबता येणार नाही. सध्या देवीच्या दर्शनाची वेळ सकाळी सात ते रात्री आठ असून त्यात एक तासाने वाढ करण्यात आली आहे. सकाळी सहा वाजल्यापासूनच भक्तांना अंबाबाईचे दर्शन घेता येईल. गेल्या कित्येक दिवसांपासून आवारातील दुकाने उघडण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी दुकानदारांनी केली होती. त्यांनाही पुरातत्व खाते व समितीच्या नियमांनुसार व्यवसायाची परवानगी देण्यात आली आहे.

-

Web Title: Ambabai's entrance will open from Friday;