अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:27 IST2021-09-21T04:27:31+5:302021-09-21T04:27:31+5:30
कोल्हापूर : परस्थ भाविकांना कमीत कमी वेळेत अंबाबाईचे दर्शन व्हावे, यासाठी ऑनलाईन नोंदणीचे स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. ...

अंबाबाई दर्शनासाठी ऑनलाईन नोंदणीची सोय करणार
कोल्हापूर : परस्थ भाविकांना कमीत कमी वेळेत अंबाबाईचे दर्शन व्हावे, यासाठी ऑनलाईन नोंदणीचे स्वतंत्र नियोजन करण्यात येणार आहे. रांगेत थांबलेल्या तसेच स्थानिक नागरिकांना कोणताही त्रास न होता ऑनलाईन नोंदणी केेलेल्यांची स्वतंत्र दर्शन रांग करता येईल का? याबाबत देवस्थान समितीसोबत चर्चा करून निर्णय घेतला जाईल, अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी सोमवारी दिली.
ते म्हणाले, सध्या मंदिरे बंद आहेत; पण ज्यावेळी मंदिरे सुरू होतील तेव्हा परस्थ भाविकांची मोठी गर्दी होणार आहे. कोल्हापुरात येण्यापूर्वीच त्यांना आपल्याला अंबाबाईचे दर्शन किती वाजता मिळणार आहे हे कळाले तर जिल्ह्यातील पुढील पर्यटनासाठी ते नियोजन करू शकतील. काही तासांसाठी भाविक येणार असेल आणि त्यांनी आधीच दर्शनासाठी बुकिंग केले असेल तर ते त्यांना अधिक सोयीचे होणार आहे. कोल्हापूरचे पर्यटन वाढवायचे असेल तर पर्यटकांना या सुविधा पुरवणे गरजेचे आहे.
अनेक नागरिक देवीच्या दर्शनासाठी रांगेत उभे असतात. कित्येक स्थानिक नागरिकांचा दिवस देवीचे दर्शन घेतल्याशिवाय सुरू होत नाही. या भाविकांना कोणताही त्रास न होता किंवा त्यांच्यावर अन्याय न होता, परगावच्या भाविकांसाठी दर्शनाची सोय केली जाईल. या नागरिकांनी किमान दोन-तीन दिवस कोल्हापूरमध्ये राहून येथील पर्यटनाला लाभ घ्यावा किंवा काही तासांसाठी आले तरी त्यांना देवीचे लवकर दर्शन व्हावे, यासाठी ऑनलाईनसारखी सुविधा निर्माण केली पाहिजे. याबाबत समितीच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल.
----