अंबाबाई मंदिर विकास तीन टप्प्यांत

By Admin | Updated: March 6, 2015 01:18 IST2015-03-06T01:14:30+5:302015-03-06T01:18:47+5:30

पालकमंत्र्यांची माहिती : अधिवेशनात निधीची तरतूद करणार; आराखडा २५० कोटींवर

Ambabai temple development in three phases | अंबाबाई मंदिर विकास तीन टप्प्यांत

अंबाबाई मंदिर विकास तीन टप्प्यांत

 कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास आता तीन टप्प्यांत करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात केवळ मंदिर व बाह्य परिसराशी निगडित विकासकामांचा आराखडा सादर करण्याच्या सूचना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या. या पहिल्या टप्प्यातील आराखड्यासाठीच्या निधीची तरतूद येत्या अधिवेशनात मंजूर केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी येथील शासकीय विश्रामगृहाच्या हॉलमध्ये अंबाबाई मंदिर विकास आराखड्यासंबंधी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार राजेश क्षीरसागर, अमल महाडिक, आयुक्त पी. शिवशंकर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, महेश जाधव उपस्थित होते. पूर्वी मंदिराचा विकास आराखडा १९० कोटींचा होता आता त्यात आणखी काही सुधारणांचा समावेश केल्याने तो २५० कोटींचा झाला आहे. तो फोट्रेस कंपनीच्या अधिकाऱ्यांनी यावेळी सादर केला.
मंत्री पाटील म्हणाले, या कामासाठी शासन एकदम २५० कोटी मंजूर करणार नाही. त्यामुळे त्याचे तीन टप्पे केले जावेत. पहिल्या टप्प्यात फक्त मंदिर आणि बाह्य परिसराच्या विकासाचा विचार व्हावा. ज्यात मंदिराच्या वास्तूचे जतन संवर्धन, दर्शन मंडप, मंदिर बाह्य ३० ते ४० मीटर परिसरातील भूसंपादन व नागरिकांचे पुनर्वसन, भक्त निवास, प्रसादालय, पार्किंगचा समावेश असेल. चार दिवसांत हा आराखडा बनविला जावा. त्यानंतर तो मुख्यमंत्र्यांसमोर सादर केला जाईल. येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पहिल्या टप्प्यातील निधीची तरतूद करु. आराखड्याचा दुसरा टप्पा धार्मिकस्थळांचे विशेषत: कोल्हापुरातील नवदुर्गा मंदिरांचा विकास, रंकाळा, पंचगंगा घाट, मंदिराशी जोडणारे रस्ते यावर आधारित असावा आणि तिसऱ्या टप्प्यात शहरातील पर्यटनवृद्धीसाठी आवश्यक असणाऱ्या बाबी, बगीच्यांचा विकास यांचा समावेश असेल. मंदिराचा विकास केंद्रीभूत ठेवून शहराचा पर्यटनाचाही विकास कसा होईल यादृष्टीने नियोजन केले जावे.
आमदार राजेश क्षीरसागर म्हणाले, कोल्हापुरात येणारे पर्यटक स्थिरावले पाहिजेत अशा सोयी निर्माण व्हाव्यात. शहराचे प्रवेशद्वार ते मंदिरापर्यंत उड्डाणपूल व्हावा, कोटितीर्थ, राजाराम, कळंबा अशा तलावांचाही विकास व्हावा, मनोरंजन पार्क, वॉकिंग ट्रॅक, पर्यटकांसाठी के.एम.टी.ची सोय व्हावी. शालिनी पॅलेस ही वास्तूही शासनाने ताब्यात घेऊन तिचा पर्यटनासाठी उपयोग करावा.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, देवस्थान समितीच्या सदस्या संगीता खाडे, सचिव शुभांगी साठे, सहसचिव एस. एस. साळवी, अभियंता सुदेश देशपांडे, उदय गायकवाड उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Ambabai temple development in three phases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.