अंबाबाई मंदिर परिसर झाला लख्ख
By Admin | Updated: May 28, 2015 00:57 IST2015-05-28T00:31:34+5:302015-05-28T00:57:37+5:30
शिवाजी विद्यापीठाची मोहीम : पाच टन कचऱ्याचा उठाव; महापालिकेचेही सहकार्य

अंबाबाई मंदिर परिसर झाला लख्ख
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातर्फे ‘स्वच्छ भारत अभियानांं’तर्गत श्री करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात बुधवारी सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यात मंदिरांच्या छतांची स्वच्छता करण्यात आली. सुमारे अडीच तासांच्या मोहिमेअंतर्गत पालापाचोळा, खुरटी झुडपे, प्लास्टिकच्या बाटल्या, आदी स्वरूपातील सुमारे पाच टन कचऱ्याचा उठाव करण्यात आला.
प्रभारी कुलगुरू डॉ. भोईटे, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष डॉ. मानसिंग जगताप, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान-व्यवस्थापन समितीचे व्यवस्थापक धनाजी जाधव, उदयसिंह राजेयादव, किशोर जाधव, कुलसचिव डॉ. डी. व्ही. मुळे, बीसीयुडी संचालक डॉ. आर. बी. पाटील, वित्त व लेखाधिकारी व्ही. टी. पाटील, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक डॉ. डी. के. गायकवाड, महानगरपालिकेचे विभागीय आरोग्य निरीक्षक टी. डी. पाडळकर यांच्या उपस्थितीत सकाळी नऊ वाजता मंदिर परिसरातील महालक्ष्मी बागेपासून स्वच्छता मोहिमेस प्रारंभ झाला.
बागेतील कचरा, पालापाचोळा, द्रोण, कागदी पत्रावळ्या, प्लास्टिक बाटल्या व ग्लास, तसेच छतांवर साचलेला कचरा साफ करण्यात आला. त्यानंतर घाटी दरवाजा छत, नवग्रह मंदिर छत, महालक्ष्मी मंदिर परिसरातील ओवाऱ्यांचे छत, छत्रपती चॅरिटेबल ट्रस्टच्या आवारातील रामाचा पार परिसर, राम मंदिर छत, बृहस्पती मंदिर परिसर, विद्यापीठ दक्षिण दरवाजा छत, सरलष्कर भवन (पूर्व) दरवाजा छत, शेषशाई मंदिर छत, महाद्वार दरवाजावरील नगारखान्याचे छत या ठिकाणी सुमारे अडीच तास विद्यापीठाचे अधिकारी, कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी श्रमदान केले.
यामध्ये मंदिर परिसरात स्वच्छता करणारे रिलायन्स ग्रुपचे कर्मचारी, महानगरपालिकेचे दोन आरोग्य निरीक्षक, चार मुकादम, तीस कामगार सहभागी झाले. पालिका प्रशासनातर्फे एक हैवा डंपर, चार घंटागाड्या, खराटे, घमेली उपलब्ध करून देण्यात आली.
एका महिन्यातील तिसरी मोहीम
राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी विद्यापीठ प्रशासनास कोल्हापूर परिसराचे वैभव असलेला रंकाळा तलाव, महालक्ष्मी मंदिर परिसर तसेच कोल्हापूर रेल्वे स्टेशन यांची स्वच्छता करण्याची मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. त्या अनुषंगाने पावसाळ्यापूर्वी ही मोहीम यशस्वी करण्यासाठी मे महिन्यात या तिन्ही ठिकाणी विद्यापीठ प्रशासनाने स्वच्छता मोहीम यशस्वीपणे राबविली.
गळतीची समस्या सुटली
मंदिर परिसरातील काही छतांवर साचलेला पालापाचोळा, त्यात उगविलेली खुरटी झुडपे, छतांच्या भिंतीमध्ये उगवलेली वड-पिंपळाची रोपे, विटांचे तुकडे, प्लास्टिक कचरा, पक्ष्यांची पिसे या मोहिमेत स्वच्छ करण्यात आली. पावसाळ्याच्या तोंडावर छतांवरील पाणी वाहून नेणाऱ्या वाहिन्यांची तोंडेही रिकामी केली. त्यामुळे पाणी साचून गळतीची समस्या उद्भवण्याची शक्यता कमी झाली.