अंबाबाई चरणी भाविकांची मांदियाळी
By Admin | Updated: October 2, 2014 23:50 IST2014-10-02T23:03:46+5:302014-10-02T23:50:32+5:30
नवरात्रौत्सवात १४ लाख भाविकांनी घेतले दर्शन-\सकाळपासूनच भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे मंदिराच्या दिशेने

अंबाबाई चरणी भाविकांची मांदियाळी
कोल्हापूर : जगद्जननी आदिशक्ती करवीरनिवासिनी अंबाबाईच्या शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमी दिवशी आज, गुरुवारी मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती. आज सकाळपासूनच भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे मंदिराच्या दिशेने येत होते. दुपारनंतर तर मंदिरात पाय ठेवायलाही जागा शिल्लक नव्हती. नवरात्रौत्सवाच्या या नऊ दिवसांत देशभरातील १४ लाखांहून अधिक भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले.
अंबाबाईने अथवा दुर्गेने महिषासुराचा वध केला तो दिवस म्हणजे अष्टमी. त्यामुळे या दिवशी देवीचा जागर घातला जातो. संपूर्ण शारदीय नवरात्रौत्सवात अष्टमी हा मुख्य दिवस मानला जातो. त्यामुळे आज सकाळपासून अंबाबाई मंदिरात भाविकांची अलोट गर्दी होती. पूर्व दरवाजामधील दर्शन रांगा भाविकांनी फुलून गेल्या होत्या. दुपारी बारा वाजता तर पुरुषांची रांग जोतिबा रोड ते भाऊसिंगजी रोड या ठिकाणी येऊन पोहोचली.
दक्षिण दरवाजातून देवीच्या मुखदर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या रांगादेखील बॅरिकेटस्च्या बाहेर आल्या होत्या. गरुड मंडपातही मुखदर्शनासाठी सोय करण्यात आली होती. याठिकाणीही मोठमोठ्या रांगा लागल्या होत्या. घाटी दरवाजातून आत येऊन मंदिरातील गणपती मंदिर येथून देवीचे मुखदर्शन घेण्यासाठीही भाविकांच्या जथ्थेच्या जथ्थे येत होते. संध्याकाळनंतर तर या गर्दीत अधिकच वाढ झाली. नवरात्रौत्सवाच्या या कालावधीत देवस्थान समितीकडे झालेल्या नोंदीनुसार जवळपास १४ लाख भाविकांनी अंबाबाईचे दर्शन घेतले आहे.