अंबाबाई शालूचा लिलाव पुन्हा गुंडाळला

By Admin | Updated: April 9, 2016 00:59 IST2016-04-09T00:58:45+5:302016-04-09T00:59:04+5:30

अपेक्षित किंमत नाही : पुन्हा प्रक्रिया होणार

Amba Bala auctioned again | अंबाबाई शालूचा लिलाव पुन्हा गुंडाळला

अंबाबाई शालूचा लिलाव पुन्हा गुंडाळला

कोल्हापूर : करवीरनिवासिनी अंबाबाई देवीस गतवर्षी नवरात्रोत्सवात तिरुपती बालाजी देवस्थानकडून शालू अर्पण करण्यात आला होता. या शालूचा अर्थात साडी प्रसादाचा लिलाव आज, शुक्रवारी गुढीपाडव्यादिवशी आयोजित केला होता. मात्र, अपेक्षित असणारी
चार लाख २० हजारांहून अधिकची बोली न आल्याने हा लिलाव दुसऱ्यांदा तहकूब करण्यात आला.
बालाजी देवस्थानने नवरात्रौत्सव २०१५ मध्ये हा शालू देवीस अर्पण केला होता. पहिल्या लिलावात अपेक्षित किंमत न आल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीने हा लिलाव रद्द केला. रद्द झालेला हा लिलाव नव्याने शुक्रवारी दुपारी १२ वाजता अंबाबाई देवी मंदिरातील देवस्थान व्यवस्थापन समितीच्या कार्यालयात घेण्यात आला. यावेळी देवस्थानचे सहसचिव शिवाजी साळवी यांनी चार लाख २० हजार ही सरकारी बोलीची रक्कम असून या किमतीच्या वर बोली लावण्यास सांगितले. मात्र, लिलावात सहभागी झालेल्यांनी काहीही प्रतिसाद न दिल्याने साळवी यांनी इच्छुकांना आपली बोली बोलण्यास सांगितले. त्यानुसार इचलकरंजीचे राम आडके यांनी २५ हजार रुपये इतकी सुरुवातीची बोली बोलली. त्यानंतर प्रदीपसिंह देसाई यांनी ३० हजार, त्यानंतर इचलकरंजीचेच सुभाष आमशे यांनी ५१ हजारची बोली लावली. काही काळ कोणीच बोली न लावल्याने पुन्हा समितीकडून बोली लावण्याचे आवाहन केले गेले. त्यानंतर राजेंद्र बुढ्ढे यांनी ५५ हजारांची बोली लावली. पुन्हा त्यानंतर प्रदीपसिंह देसाई यांनी ६५ हजार, तर आमशे यांनी ७० हजार आणि शेवटची बोली बुढ्ढे यांनी ७२ हजार इतकी लावली. या लिलावाच्या शेवटच्या बोलीनंतर लिलावाची प्रक्रियाच थांबविण्यात आली. कारण देवस्थान समितीला लिलावाच्या सरासरीवर आधारित असणारी चार लाख २० हजार ही किंमत न आल्याने दुसऱ्यांदा हा लिलाव रद्द करण्यात आला.

पाच वर्षांच्या शालू लिलावाच्या सरासरीवर आजच्या लिलावाची किंमत चार लाख २० इतकी ठरविण्यात आली होती. तरी याहीवेळी अपेक्षित किंमत न आल्याने आम्ही हा लिलाव तहकूब करीत आहोत.
- शुभांगी साठे, सचिव,
प. म. देवस्थान समिती, कोल्हापूर
देवस्थान समितीने लिलावाची किंमत आदीच ठरविल्याने याहीवेळी लिलावात अपेक्षित किंमत आली नाही. मागील वेळीही अव्वाच्या सव्वा किंमत अपेक्षित केली. इतकी किंमत सामान्य माणूस देऊ शकत नाही. -राम उषाण्णा आडके,
सहभागी, इचलकरंजी
लिलावाची रक्कम चार लाख २० हजार असतानीही सहसचिवांनी तुम्हाला वाटते तितक्या रकमेची बोली बोलण्यास का सांगितले. आम्ही २५ हजार ते ७२ हजारापर्यंत आमच्या ऐपतीप्रमाणे बोली बोलली. -प्रदीपसिंह देसाई,
कोल्हापूर, सहभागी

Web Title: Amba Bala auctioned again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.