कोल्हापूरचे अमल, सतेज पाटील कोट्यधीश
By Admin | Updated: September 27, 2014 00:12 IST2014-09-26T23:43:10+5:302014-09-27T00:12:41+5:30
विधानसभा निवडणूक : उमेदवारांनी सादर केले संपत्तीचे विवरण

कोल्हापूरचे अमल, सतेज पाटील कोट्यधीश
कोल्हापूर : कोल्हापूर दक्षिणचे कॉँग्रेसचे उमेदवार गृहराज्यमंत्री सतेज पाटील व भाजपचे उमेदवार अमल महाडिक हे दोघेही कोट्यधीश आहेत. त्यांनी आपल्या उमेदवारी अर्जांसोबत जोडलेल्या संपत्तीच्या विवरणपत्रातून त्यांनी आपल्या मालमत्तेची माहिती दिली आहे.
गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांची २३ कोटी ५६ लाख रुपयांची मालमत्ता आहे. यामध्ये त्यांच्याकडे ७ लाख १० हजार रुपये रोख आहेत. १६ लाखांचे जडजवाहीर व दागिने आहेत. १० लाख ८९ हजार रुपये किमतीची दोन वाहने आहेत. त्याचबरोबर शेती, जमीन व इमारतींची किंमत १५ कोटी ५७ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्या नावावर ४ कोटी ८ लाखांचे कर्ज आहे.
अमल महाडिक यांची मालमत्ता ६ कोटी ११ लाख रुपये इतकी आहे. त्यांच्याकडे ३ कोटी ७९ लाख ७५ हजार रुपयांची जमीन असून, त्यांच्या नावे २१ लाख रुपयांचा भूखंड आहे. त्याचबरोबर २ कोटी ३१ लाख ६९ हजारांची जंगम मालमत्ता असून, त्यामध्ये रोकड, वाहने, जडजवाहीर, विविध गुंतवणुकीचा समावेश आहे. त्यांचे १ कोटी ५६ लाखांचे कर्ज आहे.
क्षीरसागर यांची चार कोटींची मालमत्ता
‘कोल्हापूर उत्तर’मधून शिवसेनेच्या तिकिटावर निवडणूक लढविणारे राजेश क्षीरसागर करोडपती असल्याचे त्यांनी सादर केलेल्या प्रपत्रात नमूद केले आहे. क्षीरसागर व त्यांच्या पत्नीच्या नावे रोख २० हजार रुपयांची रोकड आहे, तर विविध प्रकारची ७६ लाख ६७ हजार रुपये किमतीची वाहने आहेत. २२ लाख ८६ हजार रुपयांच्या ठेवी व शेअर्स गुंतवणूक आहे. ७ लाख ८६ हजारांचे दागिने आहेत. शेती, जमीन, फ्लॅट, आदी स्थावर मिळकत २ कोटी ७९ लाखांची आहे. त्याचबरोबर १ कोटी ६० लाखांची कर्जेही त्यांच्या नावावर आहेत. त्यांची सर्व मिळून मालमत्ता ३ कोटी ९५ लाखांची आहे.
आर. के. पोवार - कॉमन मॅन
राष्ट्रवादीचे आर. के. पोवार यांच्या नावावर कोणतेच वाहन नाही. बॅँकेत २६ हजार ०७८ रुपयांच्या ठेवी आहेत. त्यांच्या नावे ५६ हजार रुपयांचे, तर पत्नीच्या नावे २ लाख ८० हजार रुपयांचे जडजवाहीर व दागिने आहेत. त्यांच्या मालकीची दोन घरे असून, त्यांची किंमत ४० लाख ७४ हजार ६३२ रुपये आहे.