चौथ्या माळेला अंबाबाई गजलक्ष्मी रूपात
By Admin | Updated: October 16, 2015 23:10 IST2015-10-16T23:09:47+5:302015-10-16T23:10:01+5:30
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा

चौथ्या माळेला अंबाबाई गजलक्ष्मी रूपात
कोल्हापूर : शारदीय नवरात्रौत्सवाच्या चौथ्या माळेला साडेतीन शक्तिपीठांपैकी एक देवता असणाऱ्या करवीर निवासिनी अंबाबाईची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. तुळजाभवानी देवीची अन्नपूर्णा फलाहार रूपात पूजा बांधण्यात आली.
शुक्रवार म्हणजे शक्तीच्या उपासनेचा वार; त्यामुळे अंबाबाई मंदिरात पहाटेपासून भाविकांच्या लांबच लांब दर्शनरांगा लागल्या होत्या. सकाळी निवृत्त विशेष पोलीस महानिरीक्षक माधवराव सानप यांच्या हस्ते अंबाबाईला शासकीय अभिषेक झाला. यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे उपस्थित होते. त्यानंतर देवीची गजलक्ष्मीच्या रूपात पूजा बांधण्यात आली. ‘सकल सौभाग्यकारिण्यै श्रीगजलक्ष्म्यै नम: । गजलक्ष्मि नमस्ते स्तु सर्वदेवस्वरूपिणी अश्र्वांश्च गोकुलं देहि सर्वकमांश्च देहि मे।।’ अष्टलक्ष्मींतील चौथी देवता श्री गजलक्ष्मी ही समुद्रमंथनातून उत्पन्न झाली. ही दुर्भाग्याचा नाश करून सर्वसौख्य देणारी देवता आहे. दुर्वास ऋषींनी दिलेल्या देवप्रसादाचा उन्मत्त इंद्राने अपमान केला, तेव्हा ‘तुम्हा देवांची सर्व संपदा क्षीरसागरात जावो,’ असा त्यांनी शाप दिला. पर्यायाने लक्ष्मीदेखील सागरात गेल्या. देव-दैत्यांनी सागरमंथन करताच जी चौदा रत्ने प्रकट झाली, त्यांपैकी एक म्हणजे लक्ष्मी. त्या प्रकट होताच ऐरावत, पुण्डरिक, वामन, कुमुद, अज्जन, पुष्पदंत, सार्वभौम, सुप्रतीक या आठ दिशांच्या धारणकर्त्या हत्तींनी त्यांना अभिषेक घातला. या देवतेच्या उपासनेने गजांत धन व समृद्धी लाभते.
रात्री भागीरथी संस्थेच्या अध्यक्षा अरुंधती महाडिक, उद्योजक महावीर गाठ, चंदुभाई ओसवाल, समीर शेठ, अवनी शेठ यांच्या हस्ते पालखीपूजन झाले. तुळजाभवानी देवीची अन्नपूर्णा फलाहार रूपात पूजा बांधण्यात आली. ही पूजा बाळकृष्ण दादर्णे, महादेव बनकर, अमर झुगर, सारंग दादर्णे, राजाराम शिंगे, अनिल रावळ, आदिनाथ चिखलकर, चंद्रकांत जाधव यांनी बांधली.