निवडणूक कठीण असली तरी मी जिगरबाज माणूस
By Admin | Updated: July 10, 2015 00:13 IST2015-07-10T00:13:47+5:302015-07-10T00:13:47+5:30
महादेवराव महाडिक : शरद पवार यांच्याशी साखर उद्योगातील अडचणींवर चर्चा

निवडणूक कठीण असली तरी मी जिगरबाज माणूस
कोल्हापूर : निवडणुकीसाठी माझी फिल्डिंग नेहमीच असते. सातत्याने लोकांशी संपर्क आहे तरीही मला निवडणूक अवघड असत; परंतु जिगरबाज माणूस नेहमीच जिंकत असतो. त्यामुळे आतापासून काळजी करण्याचे कारण नाही. ‘योग्य वेळ आल्यावर बघू आणि बोलू,’ असे आमदार महादेवराव महाडिक यांनी गुरुवारी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले.
कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांची बुधवारी महाडिक यांनी बंद खोलीत भेट घेतली. त्यामुळे या भेटीत नक्की काय चर्चा झाली, याबद्दल जिल्ह्यातील जनतेला उत्सुकता होती म्हणून गुरुवारी ‘लोकमत’ने त्यांना त्याबद्दल विचारणा केली. त्यावर आमदार महाडिक म्हणाले, ‘विधानपरिषद निवडणुकीस अजून सहा महिन्यांचा कालावधी आहे. त्यामुळे आताच या विषयावर चर्चा करण्याची घाई नाही. पवारसाहेब देशातील मोठे नेते आहेत. त्यांनी दोनवेळा साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढण्यास मदत केली होती. त्यामुळे त्यांना भेटून साखर उद्योगासंबंधीच्या अडचणी त्यांच्यासमोर मांडल्या. त्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नाही.’
येथील पंचशील हॉटेलच्या खोली क्रमांक ४०२ मध्ये वास्तव्यास असलेल्या पवार यांना आमदार महाडिक बुधवारी सकाळी भेटले. या दोघांच्या चर्चेवेळी केवळ माजी मंत्री हसन मुश्रीफ उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, के. पी. पाटील खोलीच्या बाहेर थांबले होते. कोल्हापूर दौऱ्यावर येणाऱ्या पवार यांना आमदार महाडिक नेहमी भेटतात; परंतु यावेळी मात्र त्यांच्या भेटीला विधानपरिषदेचे संदर्भ जोडले गेले आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यात चर्चा सुरू झाली. महाडिक यांनी विधानपरिषदेच्या निवडणुकीत सहकार्य करण्याचे साकडे घातले, अशा स्वरूपाची ही चर्चा आहे.
‘या महादेवराव,’ अशा शब्दांत पवार यांनी महाडिकांचे स्वागत केले. त्यानंतर त्यांच्यात साखर कारखान्यांवर चर्चा झाली. तुमचे कारखाने कसे चालले आहेत, अशी विचारणा पवारांनी केली. त्यावेळी सध्याच्या अडचणी त्यांना सांगितल्या. वीस मिनिटे ही चर्चा झाली आणि दोघांनी एकमेकांचा निरोप घेतला.
हॉटेलमधून बाहेर पडताना ते एकदमच बाहेर पडले. दोघांत चर्चा काय झाली, याचे गुपित केवळ मुश्रीफ यांनाच ठाऊक आहे. (प्रतिनिधी)
पवार-महाडिक भेटीला विधान परिषदेची किनार
महाडिक यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बाजार समितीच्या निवडणुकीत ‘राष्ट्रवादी’ला ठरवून ‘बाय’ दिला आहे. या पक्षाची ‘गोकुळ’मध्ये व विधान परिषदेसाठी आपल्याला मदत व्हावी, हे त्यामागील राजकारण आहे. ‘गोकुळ’मध्ये ती मदत झाली म्हणूनच त्यांची पुन्हा सत्ता आली. तिथे सतेज पाटील, विनय कोरे व हसन मुश्रीफ अशी युती झाली असती, तर सत्तांतर अटळ होते. आताही विधान परिषदेच्या निवडणुकीत सतेज पाटील हेच त्यांना आव्हान देतील, अशा हालचाली आहेत. अशा स्थितीत राष्ट्रवादी त्यांच्यासोबत राहिली, तर त्यांना ही लढत सोपी जाऊ शकते. त्यासाठी पवार यांचा ‘शब्द’ महत्त्वाचा असल्यानेच महाडिक त्यांच्या भेटीला गेल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे.
पवारसाहेब देशातील मोठे नेते. त्यांनी दोनवेळा साखर उद्योगाला अडचणीतून बाहेर काढले आहे. त्यामुळे त्यांच्यासमोर साखर उद्योगासंबंधीच्या अडचणी मांडल्या. त्यामध्ये राजकीय चर्चा झालेली नसल्याचे महाडिक यांनी स्पस्ट केले.