टोलला लवकरच पर्यायी रस्ता

By Admin | Updated: October 19, 2014 00:50 IST2014-10-19T00:45:13+5:302014-10-19T00:50:45+5:30

कृती समितीने धरले धारेवर : शिरोली, फुलेवाडीकडून मार्ग : सरनोबत

Alternative route to toll soon | टोलला लवकरच पर्यायी रस्ता

टोलला लवकरच पर्यायी रस्ता

कोल्हापूर : शहरवासीयांची टोलच्या जाचातून मुक्तता होण्यासाठी शिरोली टोलनाका व फुलेवाडी नाका या ठिकाणी पहिल्या टप्प्यात पर्यायी रस्त्याचे काम सुरू करणार आहे व लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर, जाऊळाचा गणपती मंदिर या रस्त्यांसंदर्भात पोलिसांना अभिप्राय देऊ, असे आश्वासन शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी आज, शनिवारी सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी समितीच्या कार्यकर्त्यांनी सरनोबत यांच्यासह महापौर तृप्ती माळवी यांनाही धारेवर धरले.
लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर ते उमा टॉकीज आणि जाऊळाचा गणपती मंदिर ते रंकाळा टॉवर हा रस्ता वाहनचालकांसह पादचाऱ्यांसाठी मृत्यूचा सापळा बनला आहे. याविरोधात टोलविरोधी समितीने लक्ष्मीपुरी व जुना राजवाडा पोलीस ठाण्यांत या निकृष्ट दर्जाच्या रस्त्यांप्रश्नी आय.आर.बी. कंपनीविरोधात गुन्हा दाखल करावा, असा तक्रारी अर्ज दिला आहे. पण, पोलिसांनी शहर अभियंत्यांनी अभिप्राय दिल्याशिवाय संबंधितांवर गुन्हा दाखल करणार नाही, अशी भूमिका घेतली. त्यामुळे आज, शनिवारी प्रा. डॉ. एन. डी. पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापौर तृप्ती माळवी यांची भेट घेतली.
यावेळी एन. डी. पाटील यांनी, युटिलिटी शिफ्टिंग न केल्यामुळे अंतर्गत वाहिन्यांचा प्रश्न उद्भवत आहे. रस्त्यांवर खड्डे पडल्याने अपघातांचे प्रमाण वाढले आहे, असे प्रतिपादन केले. दिलीप देसाई यांनीही सूचना केली. नेत्रदीप सरनोबत यांनी, लक्ष्मीपुरी फोर्ड कॉर्नर व रंकाळा टॉवर या रस्त्याचा अभिप्राय आजच देऊ, असे आश्वासन दिले. टोलमधून शहरवासीयांना मुक्ती मिळावी यासाठी पहिल्या टप्प्यात शिरोली व फुलेवाडी टोलनाक्यांजवळून पर्यायी रस्त्याच्या कामास दिवाळीनंतर सुरुवात होईल, असे सांगितले. (प्रतिनिधी)
उद्या शिरोली टोलनाक्यावर आंदोलन
शिरोली टोलनाक्याशेजारी असलेल्या मुस्कान लॉनच्या रस्त्यावरून पर्यायी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे सोमवारी (दि.२०) टोल समितीचे कार्यकर्ते सकाळी ११ वाजता या नाक्यावर थांबून शहरात प्रवेश करणाऱ्या वाहनचालकांना या पर्यायी रस्त्यावरून जाण्यास विनंती करणार असल्याचे यावेळी समितीने जाहीर केले.

Web Title: Alternative route to toll soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.