आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळी लूट कशाला?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2021 04:27 IST2021-09-12T04:27:29+5:302021-09-12T04:27:29+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढून हजाराच्या घरात गेलेले असताना ग्राहकांना सक्तीने डिलिव्हरी बॉयच्या ...

Already in the house of a thousand cylinders; Why a separate robbery for homecoming? | आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळी लूट कशाला?

आधीच सिलिंडर हजाराच्या घरात; घरपोहोचसाठी वेगळी लूट कशाला?

लोकमत न्यूज नेटवर्क

कोल्हापूर : गॅस सिलिंडरचे दर सातत्याने वाढून हजाराच्या घरात गेलेले असताना ग्राहकांना सक्तीने डिलिव्हरी बॉयच्या हातावर जास्तीचे १० रुपये टेकवावे लागतात. सिलिंडरच्या रकमेत या घरपोहोचचे कमिशनदेखील आकारलेले असते त्यामुळे ही रक्कम देणे बेकायदेशीर आहे. पण वर्षानुवर्षे जास्तीचे पैसे देण्याची पद्धत पडल्याने कोणी त्याचा जाब विचारत नाही. ज्यांनी या विरोधात तक्रार केली त्यांच्याकडून पैसे घेणे बंद झाले पण ही संख्या नगण्य आहे, त्यामुळे ग्राहकांना घरपोहोचसाठी वेगळी लूट सहन करावी लागत आहे.

सध्या गॅस सिलिंडरचे दर वाढता वाढता वाढे म्हणत हजाराच्या घरात कधी पोहोचले हे कळलेच नाही. सात वर्षांपूर्वीपर्यंत ४०० रुपयांना मिळणाऱ्या सिलिंडरच्या दरात दुपटीपेक्षा जास्त रकमेची वाढ झाली आहे. गॅस बुकिंग झाल्यानंतर संबंधित वितरकाकडून ग्राहकाला घरपोहोच सिलिंडर दिला जातो. घरपोहोचसाठी वेगळे पैसे द्यावे लागतात,असा सर्वांचा समज आहे पण हे खरे नाही. ही रक्कम सिलिंडरच्या दरातच समाविष्ट केलेली असते पण सिलिंडर देण्यासाठी येणारा डिलिव्हरी बॉय मूळ दरापेक्षा १० ते २० रुपये जास्त घेतो आणि आपणही चौकशीच्या खोलात न शिरता वरचे १० रुपये जास्तीचे देतो. त्यात आणि दिवाळीची खुशी वेगळी द्यावी लागते. पण नियमानुसार ही रक्कम घेणे आणि देणेदेखील बेकायदेशीर आहे. याविरोधात ज्या ज्या ग्राहकांनी तक्रार केली आहे, त्यांच्याकडून नंतर वरचे १० रुपये घेणे बंद केल्याचा अनुभव आहे.

--

वर्षभरात २०० रुपयांनी वाढ

ऑगस्ट आणि सप्टेंबरच्या १५ दिवसांच्या कालावधीत २५ रुपयांप्रमाणे दोनवेळा गॅस दरवाढ झाली. तर वर्षभरात एकूण २०० रुपयांनी वाढ झाली आहे. सध्या घरगुती सिलिंडरचा दर ८८८ रुपये आहे.

---

डिलिव्हरी बॉयला वेगळे १० रुपये कशासाठी?

घरपोहोच सिलिंडर आला की ठरलेल्या दरापेक्षा १० रुपये जास्तीचे द्यायचे असाच आमचा आजवरचा समज होता आणि डिलिव्हरी बॉय स्वत:ही रक्कम सांगतो. वरचे सुट्टे पैसेपण परत करत नाही. मग आम्ही वेगळे १० रुपये कशासाठी द्यायचे.

मनीषा चव्हाण (आपटे नगर)

--

कोरोनाने आर्थिक गणित कोलमडले आहे, त्यात महागाई कमी होईना. सिलिंडरचा दर तर १५ दिवसाला वाढत आहे, त्यात भुर्दंड म्हणून डिलिव्हरी बॉयला पैसे द्यावे लागतात. हे चुकीचे असले तरी वर्षानुवर्षे देत आलोय मग मध्येच देणं कसे बंद करायचे असाही प्रश्न पडतो.

रुपाली रोहिदास (शिंगणापूर)

--

वितरक काय म्हणतात?

डिलिव्हरी बॉय सिलिंडरच्या दराच्या वर जे काही पैसे घेतो ते बेकायदेशीर आहे. त्याचा वितरकाचा काहीही संबंध नाही. आम्ही ग्राहकांकडून शासनाने ठरवून दिलेल्या दरानुसार पैसे आकारतो. वरची रक्कम द्यायची की नाही हे ग्राहकांनी ठरवायचे आहे.

वितरक

---

सिलिंडरच्या दराच्या वर १० रुपये बॉयला देणे ही पद्धतच सुरू झाली आहे जी बेकायदेशीर आहे. ग्राहकांनी सिलिंडर घेताना त्याची चौकशी केली पाहिजे. सध्या मनुष्यबळ कमी असल्याने वितरणाची व्यवस्था खोलपर्यंत जात नाही. त्याचादेखील हा परिणाम आहे.

वितरक

----

Web Title: Already in the house of a thousand cylinders; Why a separate robbery for homecoming?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.