‘कुपोषणमुक्ती’साठी भत्ता, एक दिवसाचा पगार
By Admin | Updated: September 7, 2014 00:47 IST2014-09-07T00:46:35+5:302014-09-07T00:47:24+5:30
गडहिंग्लज पंचायत समिती : सदस्य, कर्मचाऱ्यांनी दाखविली कृतिशील सामाजिक बांधीलकी

‘कुपोषणमुक्ती’साठी भत्ता, एक दिवसाचा पगार
गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुका कुपोषणमुक्त करण्यासाठी पंचायत समितीच्या सदस्यांनी एक महिन्याचा भत्ता, तर सर्व अधिकारी व कर्मचारी आपला एक दिवसाचा पगार देतील, अशी घोषणा सभापती अमर चव्हाण व गटविकास अधिकारी चंचल पाटील यांनी मासिक सभेत केली.
सभापती चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या नव्या प्रशासकीय इमारतीच्या नवीन सभागृहात झालेल्या पहिल्याच सभेत कुपोषित बालकांच्या सकस आहारासाठी उत्स्फूर्त वर्गणी काढून लोकप्रतिनिधी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधीलकीचा वस्तूपाठ घालून दिला.
शिक्षणतज्ज्ञ डॉ. जे. पी. नाईक यांची जयंतीदेखील शिक्षकदिनीच येते; मात्र त्यांचा विसर पडला आहे. किमान आपल्या परिसरात तरी त्यांची जयंती साजरी व्हावी, अशी सूचना अॅड. हेमंत कोलेकर यांनी केली. खासगी शाळांचे आक्रमण थोपविण्यात जिल्हा परिषद शाळांमध्ये सेमी इंग्रजीचे वर्ग वाढविण्याबरोबरच ‘स्पोकन इंग्रजी’चे तास सुरू करावेत, अशी सूचना त्यांनी केली.
पाच वर्षांपासून हलकर्णी प्राथमिक आरोग्य केंद्रात कायमस्वरूपी डॉक्टर नाही. दर महिन्याला मागणी करूनही पूर्व भागातील २७ खेड्यांवर अन्याय झाला आहे. पर्यायी चांगला डॉक्टर द्या, जनतेला सेवा द्या, अशी आग्रही मागणी बाळेश नाईक यांनी केली. किमान नूल येथील डॉ. शेटे यांना आठवड्यातून एक दिवस हलकर्णीला पाठवा, अशी मागणी त्यांनी केली. शिक्षण विभागावरच तब्बल एक तास चर्चा झाली. कृषी, पशुसंवर्धन, बांधकाम, लघुजलसिंचन व आरोग्य, आदी खात्यांच्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला. सर्व सदस्यांसह विविध खात्यांचे खातेप्रमुख व प्रतिनिधी उपस्थित होते. गटविकास अधिकारी पाटील यांनी स्वागत केले. उपसभापती स्नेहल गलगले यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)