आईच्या स्मृतिदिनी गरजंूना मदतीचे वाटप
By Admin | Updated: July 18, 2015 00:14 IST2015-07-17T23:49:40+5:302015-07-18T00:14:11+5:30
प्रबोधनाचे पाऊल : करंबे कुटुंबीयांचा आदर्शवत उपक्रम

आईच्या स्मृतिदिनी गरजंूना मदतीचे वाटप
कोल्हापूर : आई ही एक देवता असून, ती नेहमी सर्वांचा चांगलाच विचार करीत आली आहे. प्रत्येकात आईचे मातृत्व आहे. त्यामुळे समाजाने आईची भूमिका बजावावी, असे आवाहन कणेरी मठाचे मुप्पीन काडसिद्धेश्वर स्वामी यांनी शुक्रवारी येथे केले. करंबे कुटुंबीयांनी आईच्या स्मृतिदिनी गरजूंना केलेली मदत आदर्शवत आहे, असेही त्यांनी सांगितले.शनिवार पेठेतील खोलखंडोबा हॉलमध्ये परिसरातील करंबे कुटुंबीयांतर्फे आई ताराबाई करंबे यांच्या पहिल्या स्मृतिदिनानिमित्त पारंपरिक खर्चाला फाटा देऊन गरजू व्यक्तींना मदत देण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कलासाधना मंचासह परिसरातील मंडळांनी या उपक्रमाचे संयोजन केले.मुप्पीन स्वामी यांच्यासह उदय गायकवाड, सुमित्रादेवी शिंदे, नगरसेवक सत्यजित कदम, किशोर देशपांडे, प्रा. अमरसिंह शेळके, प्राचार्य अजेय दळवी, गजानन लिंगम, मुरलीधर गावडे, प्रशांत चिटणीस, एस. आर. पाटील, विलासराव मुळे, मिलिंद यादव, आदींच्या प्रमुख उपस्थितीत विलास पांडव यांना मदत, शिवाजी मराठा हायस्कूलमधील पन्नास मुलांना पादत्राणे, वालावलकर हायस्कूलमधील अकरा खेळाडूंना क्रीडासाहित्य आणि ग. गो. जाधव बालमंदिराला खेळणी, खोलखंडोबा बालमंदिराला शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्याचबरोबर एक किंवा दोन मुलींवर कुटुंब नियोजन केलेल्या दाम्पत्यासह सत्कारही यावेळी करण्यात आला.
यावेळी कणेरी मठ येथील अनाथ मुलांच्या शिक्षण खर्चासाठी करंबे कुटुंबीयांनी मुप्पीन स्वामींकडे आर्थिक मदत सुपूर्द केली. चित्रकार विजय टिपुगडे यांनी प्रास्ताविक केले. प्रार्थना बेहरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय पेंटर यांनी आभार मानले. यावेळी बाळासाहेब करंबे, राजेंद्र करंबे, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)