शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली 'युती'

By Admin | Updated: July 10, 2015 00:11 IST2015-07-10T00:11:14+5:302015-07-10T00:11:14+5:30

पी. एन. पाटील यांची टीका : राष्ट्रवादीच्या कारभाराबद्दल न बोललेच बरे...!

'Alliance' raised in front of farmers | शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली 'युती'

शेतकऱ्यांच्या मुळावर उठलेली 'युती'

कोल्हापूर : केंद्रात व राज्यात भाजप-शिवसेना सत्तेत आल्यापासून शेतकऱ्यांच्या मुळावर उठणारा व्यवहार त्या पक्षाच्या दोन्ही सरकारकडून सुरू आहे, अशाच लोकांना पुन्हा कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत निवडून देणार का, अशी विचारणा काँग्रेसच्या शाहू आघाडीचे नेते व जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष पी. एन. पाटील यांनी उपस्थित केला आहे. बाजार समितीत गेल्या दहा वर्षांत राष्ट्रवादी काँग्रेसने काय दिवे लावले, याबद्दल न बोललेच बरे, अशी बोचरी टीकाही त्यांनी केली.
काँग्रेसने कमी कालावधी मिळूनही सक्षम पॅनेल उभे केले आहे. काँग्रेसचा चांगला कारभार करून शेतकऱ्यांना न्याय देऊ शकतो, ही भावना असल्याने समितीच्या निवडणुकीत बहुमत मिळण्यात अडचण नाही. सत्ता मिळाल्यास आम्ही स्वच्छ, पारदर्शी व शेतकऱ्यांच्या हिताचा कारभार करून दाखवू, अशी ग्वाही पाटील यांनी यानिमित्ताने दिली.
पी. एन. पाटील म्हणाले,‘ज्यांना राजकारणातले काही कळत नाही ते लोक आम्हाला काँग्रेसने तिथे काय केले, अशी विचारणा करीत आहेत. समितीत सलग दहा वर्षे राष्ट्रवादीची सत्ता आहे. आम्ही कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ असो की जिल्हा मध्यवर्ती बँक असो तिथे आमच्याकडे सत्ता असताना शेतकरी हिताचाच कारभार केला आहे. गोकुळ हा राज्यातीलच नव्हे, तर देशातील नावाजलेला संघ म्हणून नावलौकिक मिळवून आहे. हा संघ इतका चांगला राहू शकला कारण तो काँग्रेसच्या ताब्यात आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेत राष्ट्रवादीची सत्ता असताना त्या बँकेचे काय झाले हे सगळ््या जिल्ह्यास ज्ञात आहे. ते मी नव्याने सांगायची गरज नाही. शिवसेना-भाजपने लोकसभा व विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने दिली. लोकांना ‘अच्छे दिन आएगें’ची भूलथाप मारली आणि सत्ता मिळवली; परंतु आता प्रत्यक्षात उलटाच अनुभव येत आहे. महाराष्ट्राचा ‘दोन नंबर’चा असलेला साखर उद्योग याच सरकारच्या धोरणामुळे मोडण्याची चिन्हे आहेत. पुढील वर्षी कारखान्यांना हंगामच सुरू करता येणार नाही, अशी स्थिती आहे, आणि हेच पक्ष बाजार समितीच्या निवडणुकीत आम्हीच कसे शेतकरी हिताचा कारभार करणारे म्हणून डांगोरा पिटत आहेत. त्यांच्यावर विश्वास ठेवायला जनता दूधखुळी नक्कीच नाही. शेतकऱ्यांबद्दल या पक्षाच्या मनात आकस आहे. त्यांची धोरणेही तशीच आहेत. म्हणूनच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता काढून काँग्रेसला चांगले यश मिळवून दिले आहे. त्याचीच पुनरावृत्ती बाजार समितीच्या निवडणुकीतही झाल्याशिवाय राहणार नाही.’
काँग्रेसने घर बांधले आहे, बाकीचे पक्ष हे भाड्याच्या घरातील आहेत. त्यांना सर्वसामान्य जनता, शेतकरी यांच्या हिताबद्दल कोणतेही सोयरसुतक नसल्याचे सांगून पी. एन. पाटील म्हणाले, ‘शिवसेना - भाजप ही घोटाळाबाज युती असल्याचा अनुभव महाराष्ट्राला येत आहे. रोज एक नवा घोटाळा बाहेर येत आहे. त्यांनी सत्तेवर आल्यापासून शेतकरी हिताचा एकही निर्णय घेतलेला नाही. अशा पक्षाचे जिल्ह्यातील नेते तरी बाजार समितीत जाऊन काय दिवे लावणार, याचा विचार शेतकऱ्यांनी करायला हवा. बाजार समिती दुरुस्त व्हायची असेल, तर काँग्रेस हाच सक्षम पर्याय आहे. लोकांनी आम्हाला संधी द्यावी. समितीचा कारभार लोकाभिमुख करून दाखवू.’
जिल्हा बँकेत सन्मान मिळाला म्हणूनच राष्ट्रवादीसोबत आघाडी केली; परंतु बाजार समितीच्या निवडणुकीत त्या पक्षाच्या नेत्यांनी गाफील ठेवून गद्दारी केली आहे. मुश्रीफ यांनी विनय कोरे यांना घेऊन पॅनेल करायचे अगोदरच ठरविले होते. मी काँग्रेससाठी किमान सहा तालुक्यांतून सहा जागांची मागणी केली होती; परंतु ते फक्त करवीर तालुक्यालाच जागा द्यायला तयार होते. ते आम्हाला मान्य नव्हते. सगळ््या लोकांना सगळ््यावेळी आपण फसवू शकतो, असे काहींना वाटते, परंतु तसे घडत नाही. कारण लोक शहाणे झाले आहेत याचीही नोंद संबंधितांनी जरूर घ्यावी, असेही पी. एन. पाटील यांनी सूचित केले. (प्रतिनिधी)
(उद्याच्या अंकात :
राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ)

४लोकाभिमुख व शेतकरी हिताचा कारभार
४बाजार समिती म्हणजे भूखंड विक्री व गैरव्यवहार याला चाप लावू
सत्तेत आल्यावर हे करु
गूळ उद्योगाला बळ मिळण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाची जोड देऊ
भाजीपाला विक्रेते शेतकऱ्यांसाठी खास विक्री केंद्रे सुरू करणार
बाजार आवारातील रस्ते, स्वच्छतागृहे व पिण्यासाठी स्वच्छ पाणीपुरवठा करू
शेतीमाल घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांसाठी निवासाची उत्कृष्ट व्यवस्था करू
शेतकऱ्यांना चांगल्या सोयीसुविधा देऊ

Web Title: 'Alliance' raised in front of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.