१७ वर्षे गटातही कोल्हापूरची आघाडी
By Admin | Updated: November 27, 2015 01:24 IST2015-11-27T01:17:24+5:302015-11-27T01:24:22+5:30
राज्यस्तरीय शालेय खो-खो : नागपूरवर दणदणीत विजय

१७ वर्षे गटातही कोल्हापूरची आघाडी
वाळवा : क्रांतिमाता लक्ष्मीबाई नायकवडी क्रीडानगरी वाळवा येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय शालेय खो-खो स्पर्धेत दुसऱ्या दिवशी १७ वर्षे मुले गटातील कोल्हापूर विरुद्ध नागपूर सामन्यात कोल्हापूरच्या संघाने एक डाव १४ गुणांनी नागपूरवर दणदणीत विजय मिळविला.या एकतर्फी झालेल्या सामन्यात कोल्हापूर संघाच्या शुभम माने याने ८ गडी, अभिषेक केरीपाळे याने ४ गडी व प्रथमेश शेळके याने ३ गडी झटपट बाद केल्याने त्यांनी नागपूर विभाग संघावर सहज विजय मिळविला. १७ वर्षे मुले गटातील दुसरा सामना पुणे विरुद्ध नाशिक संघात झाला. अत्यंत चुरशीने पुणे विभागीय संघाने तीन गुणांनी नाशिकवर मात केली. या सामन्यात पुणे संघाचा आकाश वाघ व नाशिकचा हरिचंद्र जाधवने उत्कृष्ट खेळ केला. १४ वर्षे मुली गटातील पहिली लढत लातूर विरुद्ध नाशिक संघात झाली. यामध्ये लातूर संघाने २ गुण व ४० सेकंदांनी विजयी सलामी दिली. लातूर संघाच्या वैष्णवी चौधरी हिने, तर नाशिक संघाच्या दीपाली चौधरी हिने अष्टपैलू खेळी केली. १७ वर्षे मुली गटातील लढत नाशिक विरुद्ध मुंबई संघात अटीतटीची झाली. या लढतीत मुंबई विभाग संघाने नाशिक विभाग संघावर दोन गुणांनी मात करून विजयी पताका फडकविली. १९ वर्षे मुले गटात नाशिक विरुद्ध औरंगाबाद सामना झाला. यामध्ये नाशिक संघ विजयी झाला, तसेच १९ वर्षे मुली गटात औरंगाबाद विरुद्ध मुंबई लढतीत मुंबई संघ विजयी ठरला. सर्व सामन्यांसाठी राष्ट्रीय खो-खो खेळाडू आणि हुतात्मा संकुलाचे नेते वैभवकाका नायकवडी, महाराष्ट्र राज्य कबड्डी संघाचा गतवर्षीचा कर्णधार वीरधवल नायकवडी, अभिजित नायकवडी, राष्ट्रीय खो-खो खेळाडू नरेश सावंत, तानाजी सावंत, प्रतीक महाजन, प्राजक्ता पवार, हुतात्मा बझार अध्यक्षचे बाळासाहेब कदम उपस्थित होते. (प्रतिनिधी)