आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:46 IST2021-03-13T04:46:31+5:302021-03-13T04:46:31+5:30
कागल : राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच, पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द ...

आघाडी सरकारने शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली
कागल
: राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार दिलेला शब्द पाळत तर नाहीच, पण वीज बिलाबाबत दिलेला शब्द त्यांनी केवळ आठ दिवसांत फिरविला आहे, तसेच प्रोत्साहन अनुदानाबाबत कोणताच ठोस निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे राज्यातील सर्वसामान्य जनता व शेतकरी यांच्या तोंडाला सरकारने पाने पुसली आहेत, अशी टीका भाजपाचे जिल्हाध्यक्ष समरजित घाटगे यांनी केली आहे.
राज्यातील थकबाकीदार वीज ग्राहकांचे कनेक्शन तोडण्यासाठी आठ दिवसापूर्वी स्थगिती दिली होती; मात्र अधिवेशन संपताच ही स्थगिती उठवली आहे. त्यांच्या या धोरणामुळे महागाईच्या आगीत होरपळणाऱ्या जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार राज्य शासनाकडून करण्यात आला आहे. प्रामाणिकपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजार रुपयांचे प्रोत्साहनपर अनुदान व लॉकडाऊन काळातील वीज बिले माफ करण्यासाठीची तरतूद अर्थसंकल्पीय अधिवेशनात करून हे सरकार राज्यातील शेतकरी व ग्राहकांना दिलासा देईल, अशी आशा होती; परंतु यामध्येही सरकारने फसवणूक केली आहे. मराठा आरक्षण मुद्द्यांवरही सरकार अपयशी ठरले आहे.
चौकट
जनतेच्या रोषास सामोरे जावे लागेल!
थकबाकीदारांचे वीज कनेक्शन न तोडण्याचा आदेश मागे घेताच वीज कर्मचारी आज पहिल्या दिवशी या ग्राहकांच्या दारात जाऊन वीज कनेक्शन कापत आहेत. हा सर्वसामान्य जनतेवर फार मोठा अन्याय आहे. त्यामुळे कनेक्शन कट करणे तत्काळ थांबवा, अन्यथा सरकारला जनतेच्या फार मोठ्या रोषास सामोरे जावे लागेल, असेही घाटगे म्हणाले.
कृपया समरजित घाटगे यांचा फोटो छापावा.