युती सरकार, एकदम बेकार...
By Admin | Updated: July 23, 2015 00:48 IST2015-07-23T00:47:26+5:302015-07-23T00:48:41+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा : कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा विविध मागण्यांसाठी आंदोलन

युती सरकार, एकदम बेकार...
कोल्हापूर : ‘युती सरकार, एकदम बेकार’, ‘शिक्षणमंत्री हाय हाय’, ‘आमच्या मागण्या मान्य करा’, अशा घोषणा देत विविध प्रलंबित मागण्यांसाठी जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी संगीता चौगुले यांना निवेदन दिले.
संचमान्यतेच्या आॅनलाईन संगणक प्रणालीतील दोष दूर न केल्याच्या निषेधार्थ, तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षण महासंघाच्या आदेशानुसार हा मोर्चा काढण्यात आला. यासाठी दुपारी तीन वाजता शिक्षक टाऊन हॉल येथे जमले. तेथून दसरा चौक, लक्ष्मीपुरी, कोंडा ओळ, उद्योग भवन मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आला. मोर्चात आंदोलनकर्ते शिक्षक राज्य सरकारच्या निषेधाच्या घोषणा देत होते. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे आला. प्रवेशद्वारावर पोलिसांनी आंदोलनकर्त्यांना रोखले. याठिकाणी आंदोलनकर्त्यांनी ‘युती सरकार, एकदम बेकार’, ‘शिक्षणमंत्री हाय हाय’, अशा जोरदार घोषणा दिल्या. त्यानंतर आंदोलनकर्त्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी चौगुले यांना देऊन शिक्षकांच्या भावना सरकार, शासनाला कळविण्याची विनंती केली. आंदोलनात संघाचे अध्यक्ष एस. बी. उमाटे, सचिव अविनाश तळेकर, उपाध्यक्ष ए. डी. चौगुले, सी. व्ही. जाधव, आर. एफ. देवरमणी, पी. डी. पाटील, एम. के. परीट, पी. के. पाटील, आर. पी. टोपले, बी. बी. घव्हाळे, बी. एस. पाटील, अशोक पाटील, आदींसह शिक्षक सहभागी झाले होते.
प्रलंबित मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारला २० आॅगस्टपर्यंत मुदत दिली होती. परंतु, याबाबतचा निर्णय घेतला नसल्याने महासंघाने आंदोलन तीव्र करण्याचा निर्णय घेतला आहे. यानुसार बुधवारी मोर्चा काढण्यात आला. राज्यातील सर्व शिक्षक उद्या, शुक्रवारपासून काळ्या फिती लावून काम करतील. त्यानंतर २७ जुलैला मुंबईत जेल भरो आंदोलन आणि १ आॅगस्टला राज्यातील सर्व तहसील कार्यालयांसमोर उपोषण करण्यात येईल.
- प्रा. ए. एस. तळेकर,
सचिव, कोल्हापूर जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघ.