महापालिका निवडणुकीत पुन्हा ‘युती’चाच फॉर्म्युला

By Admin | Updated: May 25, 2015 00:24 IST2015-05-24T23:43:22+5:302015-05-25T00:24:39+5:30

मुख्यमंत्र्यांचे संकेत : अंतिम निर्णय जिल्हा कार्यकारिणीचाच

'Alliance' formula again in municipal elections | महापालिका निवडणुकीत पुन्हा ‘युती’चाच फॉर्म्युला

महापालिका निवडणुकीत पुन्हा ‘युती’चाच फॉर्म्युला

कोल्हापूर : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक एकत्रित लढविण्याचा शिवसेना-भाजपचा जुनाच ‘फार्म्युला’ आहे. कोल्हापूर महापालिकेची निवडणूक याच फॉर्म्युल्यानुसार एकत्रित लढविण्याचा मानस असला तरी युतीबाबतचे सर्वाधिकार जिल्हा कार्यकारणीला आहेत, मात्र युतीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याच्या सुचना कार्यकारणीस दिल्या असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरी हॉल येथे रविवारी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
मागील वेळेप्रमाणेच यंदाही महानगरपालिकेची निवडणूक पक्षीय पातळीवरच होणार आहे. कॉँग्रेस व राष्ट्रवादी स्वतंत्रपणे निवडणूक लढवून निवडणुकीनंतर युती करण्याची शक्यता राजकीय तज्ज्ञांतून व्यक्त होत आहे. तर शिवसेना व भाजप ही निवडणूक स्वतंत्र लढविणार की निवडणुकीनंतर एकत्र येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे.
मात्र आता खुद्द मुख्यमंत्री फडणवीस यांनीच युतीबाबत संकेत दिल्याने सेना-भाजप निवडणुकीपूर्वीच एकत्रित लढण्याबाबत खल सुरू होणार आहे.
महापालिका निवडणूक जशी जवळ येईल तशी सर्वच राजकीय पक्षांचे धोरण मार्गी लागत आहे. शिवसेना व कॉँग्रेसने यापूर्वीच निवडणुका पक्षीय स्तरावर लढविण्याची तयारी केली आहे. राज्यात सत्तास्थापन केल्यापासून सेना व भाजपमध्ये महापालिका काबीज करण्याची तयारी सुरू झाली आहे. शहर उत्तर विधानसभा निवडणुकीत भाजपने प्रथम ४० हजारांचा टप्पा गाठला, तर शहरातील २२ प्रभागांचा समावेश असलेल्या कोल्हापूर शहर दक्षिण मतदार संघात भाजपचे
अमल महाडिक विजयी झाले. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने भाजपने मोठी तयारी सुरू केली.
भाजपचे मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांत मनपा निवडणूक लढविण्याविषयी कमालीचा उत्साह आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपची ताकद शिवसेनेच्या तुलनेत थोडी कमी असली तरी आता परिस्थितीत मोठा बदल झाल्याचे चित्र आहे. सत्ता आणि निवडणूक लढविण्यासाठी लागणारी साधने भाजपकडे उपलब्ध आहेत. निवडणुकीसाठी सर्व रसद स्थानिक नेत्यांना राज्य तसेच केंद्रीय पातळीवरून मिळणार आहे. त्यात युतीमार्फत निवडणूक लढवून महापालिका काबीज करण्याचा पर्यायही खुला असल्याचे संकेत फडणवीस यांच्याकडून मिळाले आहेत. मात्र, यास दोन्ही पक्षाच्या स्थानिक नेतृत्वाकडून कसा प्रतिसाद मिळतो, यावरच युतीचे भवितव्य आहे.
भाजप शिवसेनेसोबत गेली २० वर्षे स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका लढविण्यात येत आहे. आताही त्याच फॉर्म्युल्याप्रमाणे लढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.


जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाचा ‘रोड मॅप’ तयार
राज्यातील त्या-त्या विभागातील उत्पादनाची क्षमता व ताकद असणाऱ्या उद्योगांचा विकास करून जिल्ह्याची औद्योगिक उन्नती करण्याचा राज्य शासनाचा मानस आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा औद्योगिक विकास करण्याबाबत आवश्यक घटकांची पूर्तता करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘रोड मॅप’ तयार केला आहे. त्यानुसार येथील ऊस उत्पादन हा घटक डोळ्यांसमोर ठेवून साखर कारखानदारी बळकट करणे तसेच इतर उद्योगांना चालना देण्यावर भर राहील, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे रविवारी स्पष्ट केले.
भाजप राज्य अधिवेशनानिमित्त कोल्हापूर दौऱ्यावर आलेल्या मुख्यमंत्री फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी महिला व बालकल्याण राज्यमंत्री विद्या ठाकूर, आमदार अमल महाडिक, जिल्हाध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, अशोक देसाई, केशव उपाध्ये, आदी उपस्थित होते.
कोल्हापूर जिल्ह्याचा मुख्य आर्थिक स्रोत शेती हाच आहे. कृषीवर आधारित अर्थव्यवस्थेच्या जोरावरच कोल्हापूरकरांनी मुंबईपाठोपाठ दरडोई उत्पन्न मिळविण्यापर्यंत मजल मारली आहे. कारखानदारीबरोबरच इतर उद्योगांना ऊर्र्जितावस्था देण्याबाबत काय करता येईल? राज्य शासनाची यासाठी नेमकी कोणती भूमिका राहील ? याबाबत सर्वंकष माहितीआधारे जिल्हा प्रशासनाने अहवाल तयार केला आहे. त्यानुसार जिल्ह्याचा विक ास केला जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.
कोल्हापूरचे प्रमुख सर्व प्रश्न सोडविण्यास आम्ही बांधील आहोत. देशातील प्रमुख प्रदूषित नद्यांमध्ये पंचगंगा नदीचा समावेश होतो. नदी प्रदूषणमुक्त करण्यासाठी राज्य शासनाने भरघोस तरतूद केली आहे. यापुढे प्रदूषणमुक्तीसाठी आवश्यक पावले उचलण्यास शासन कमी पडणार नाही, असे आश्वासनही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले.

Web Title: 'Alliance' formula again in municipal elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.