वर्तकांचे पाटणकरांवरील आरोप बिनबुडाचे
By Admin | Updated: November 28, 2015 00:13 IST2015-11-28T00:02:10+5:302015-11-28T00:13:02+5:30
संपत देसाई : ...अन्यथा कष्टकरी जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल

वर्तकांचे पाटणकरांवरील आरोप बिनबुडाचे
आजरा : ‘सनातन’ संस्थेचे डॉ. अभय वर्तक यांनी डॉ. भारत पाटणकर यांच्यावर केलेल्या आरोपामुळे वर्तक यांचे राजकीय व सामाजिक अज्ञान स्पष्ट होते. गेली ४० वर्षे डॉ. पाटणकर हे कष्टकरी, श्रमिक जनतेच्या न्यायासाठी पूर्णवेळ आपले आयुष्य झोकून देऊन काम करीत आहेत. अशा वेळी अभय वर्तक यांनी डॉ. पाटणकर यांच्यावर बिनबुडाचे आरोप करू नयेत, असा सल्ला श्रमिक मुक्ती दलाचे राज्य संघटक कॉ. संपत देसाई यांनी येथे पत्रकार बैठकीत बोलताना दिला.
कॉ. देसाई म्हणाले, जलसिंचन घोटाळ्याबाबत डॉ. पाटणकर गप्प का बसले असे म्हणणाऱ्या वर्तकांनी डॉ. पाटणकरांच्या नेतृत्वाखाली २०१३-१४ मध्ये लोकाभिमुख पाणी धोरण मंचच्या माध्यमातून झालेली आंदोलने पहावीत. पाण्याची चोरी करणाऱ्या आणि सिंचन घोटाळा करणाऱ्या मंत्र्यांच्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रभर एकाचवेळी अनेक जिल्ह्यांत मोर्चे निघाले होते. पुणे येथे श्रमिक मुक्ती दलाच्या पुढाकाराने सर्व संघटनांना एकत्र करून संघर्ष परिषद घेण्यात आली होती.
सन २०१४ मध्ये आझाद मैदान मुंबई येथे हजारो शेतकऱ्यांच्या साक्षीने धरणे आंदोलने प्रा. डॉ. एन. डी. पाटील व डॉ. भारत पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली झाली होती. त्यावेळी अभय वर्तक आणि त्यांची सनातन संस्था कुठे होती, असा प्रश्नही देसाई यांनी उपस्थित केला.
मदरशांचे कोम्बिंग आॅपरेशन करा, असे पाटणकर का म्हणत नाहीत असे म्हणणाऱ्या वर्तक यांनी पाटणकर यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर, सांगली, सातारा या जिल्ह्यांतील सर्व मदरशांच्या मौलानांना सोबत घेऊन ज्यांना मदरशांविषयी संशय वाटतो त्यांनी मदरशांमध्ये यावे आणि मदरसे तपासावेत, अशी मागणी घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा काढला होता हे वर्तक यांनी समजून घ्यावे.
पाटणकर आणि दाभोलकर कुटुंबीयांवर गुन्हा दाखल करण्याच्या वर्तक यांच्या सल्ल्याची पोलिसांना गरज नाही. याबाबत निर्णय घेण्यास पोलीस खाते सक्षम आहे.
पोलीस आणि समाजाला गुन्हेगार कोण आहेत याची चांगलीच माहिती आहे. देशातील कष्टकरी व श्रमिक जनतेमध्ये फूट पाडू पाहणाऱ्या वर्तक आणि त्यांच्या सनातन संस्थेने कोणतेही विधान किंवा लिखाण करताना जबाबदारीने करावे. तत्पूर्वी, त्यांचे सामाजिक योगदान आणि कष्टकरी श्रमिकांसाठीचा संघर्षही पहावा; अन्यथा महाराष्ट्रातील कष्टकरी जनता त्यांना त्याच भाषेत उत्तर देईल, असा इशाराही देसाई यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)