‘दौलत’साठी सर्वतोपरी सहकार्य
By Admin | Updated: June 10, 2016 00:25 IST2016-06-10T00:24:57+5:302016-06-10T00:25:59+5:30
चंद्रकांतदादा पाटील : गोपाळरावांचा भाजपमध्ये प्रवेश; तुर्केवाडी येथे विकासपर्व मेळावा

‘दौलत’साठी सर्वतोपरी सहकार्य
चंदगड : तालुक्यातील शेतकऱ्यांची जननी म्हणजे दौलत कारखाना आहे. तो सुरू झालाच पाहिजे. कारखाना सुरू करण्यासाठी येणाऱ्या पार्टींना शासन स्तरावर सर्वतोपरी मदत करू. दौलत चालवायला घेणाऱ्या कंपनीला कर्ज भरण्यासाठी १० वर्षे मुदत देऊन कर्जावरील व्याजात सवलत देण्यात येईल, असे आश्वासन सहकारमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले.
तुर्केवाडी (ता. चंदगड) येथील महादेवराव वांद्रे पॉलिटेक्निकमध्ये आयोजित विकासपर्व मेळाव्यात ते बोलत होते. तालुकाध्यक्ष नामदेव पाटील यांनी प्रास्ताविक करून विकासासाठी शासनाने निधी देऊन बॅकलॉग भरून काढावा, अशी मागणी केली. यावेळी गोपाळराव पाटील यांनी कार्यकर्त्यांसह भाजप पक्षात प्रवेश केला. त्यांचा मंत्री पाटील यांच्या हस्ते सत्कार झाला.
पाटील म्हणाले, राज्यात व केंद्रात भाजपचे सरकार आहे. हे सरकार शेतकऱ्यांना सुरक्षितता देण्याबरोबरच सर्व गरिबांना मोफत घरे देऊन गरिबी हटविण्याचे काम करत आहे. ७० हजार शेतकऱ्यांना सोलर पंप वाटप केले. जलयुक्त शिवार योजनेंतर्गत १ लाख कामे उपलब्ध केली, तर २४ टीएमसी पाणी अडविले. यासह त्यांनी राज्य व केंद्र शासनाच्या विविध योजनांची माहिती दिली. गोपाळराव यांना आमदार करायचे असेल तर येणाऱ्या पं. स. व जि. प. निवडणुकीत भाजपचे कमळ फुलवावे लागेल. त्यासाठी संघटनात्मक काम करावे.
बेळगाव ग्रामीणचे आमदार संजय पाटील यांनी काँगे्रसला हटविल्याशिवाय देशातील गरिबी हटणार नाही. १८-१८ तास देशासाठी काम करणारे पंतप्रधान देशाचे भविष्य बदलणार आहेत. ६० वर्षे जसे काँगे्रसवर आंधळे प्रेम केले तसे यापुढे करू नका, असे सांगून भाजप जातीचा विकास नाही, तर व्यक्तीचा विकास करते.
गोपाळराव पाटील म्हणाले, ‘दौलत’ सुरू करण्यासाठी मी जिवापाड प्रयत्न केले आहे. काही मंडळी जाणीवपूर्वक ‘दौलत’मध्ये अडथळा आणत आहेत. बीव्हीजी, कॅरी इंडिया या चांगल्या कंपन्यांनाही पळवून लावले. एव्हीएच घालवत व दौलत सुरू करतो म्हणून तालुक्यातील जनतेची दिशाभूल करून निवडणुका जिंकल्या. दौलत हा तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रश्न असल्याने राज्य व केंद्राने मदत करावी, अशी मागणी केली. यावेळी बाबा देसाई यांनीही मनोगत व्यक्त केले. शिवाजी बुवा, सुरेश घाडगे, महादेव वांद्रे, महिला अध्यक्षा पाटील, शांता गावडे, शांताराम मुरकुटे, सरपंच लक्ष्मी कांबळे, आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते. (प्रतिनिधी)