टोलविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या
By Admin | Updated: October 15, 2014 00:29 IST2014-10-15T00:28:41+5:302014-10-15T00:29:28+5:30
सर्वोच्च न्यायालयात दाद मागणार : टोलचा चेंडू नव्या सरकारच्या कोर्टात

टोलविरोधातील सर्व याचिका फेटाळल्या
कोल्हापूर : कोल्हापूरचा टोल रद्द करावा, या मागणीसाठी न्यायालयात दाखल केलेल्या तीनही याचिका आज, मंगळवारी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश एस. सी. धर्माधिकारी व ए. के. मेनन यांनी फेटाळल्याचे जाहीर केले. टोलविरोधातील सर्व याचिका फेटाळल्याने आता पुन्हा सर्वोच्च न्यायालयात टोलविरोधी कृती समिती दाद मागणार आहे. न्यायालयाच्या निर्णयाने टोलचा चेंडू नव्या सरकारच्या कोर्टात जाणार आहे.
मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर शहरातील टोलवसुलीस दिलेली स्थगिती सर्वाेच्च न्यायालयाने ५ मे २०१४ रोजी उठविली. याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने फेरविचार करून ३१ जुलैपर्यंत अंतिम निर्णय घेण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले होते. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समिती, राज्य शासन व आयआरबी कंपनीस उच्च न्यायालयाने म्हणणे मांडण्यासाठी वेळ देत २९ व ३० सप्टेंबर २०१४ अशी दोन दिवस सुनावणी घेतली. यानंतर न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता.
आज न्यायालयाने सर्व याचिका फेटाळल्याचे जाहीर केले. न्यायालयात टोलबाबत सकारात्मक तोडगा न निघाल्याने टोलचा चेंडू पुन्हा नव्याने राज्यात सत्तेवर येणाऱ्या सरकारच्या कोर्टात जाणार आहे.
शिरोली टोलनाका परिसरात रस्ता रोखला
कोल्हापूर : टोलवसुलीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या विरोधी निकालाचे पडसाद आज, मंगळवारी कोल्हापुरात उमटले. सर्वपक्षीय टोलविरोधी कृती समितीने आय.आर.बी. कंपनीविरोधात जोरदार घोषणाबाजी करीत, शिरोली नाका परिसरात सायंकाळी समितीतील कार्यकर्त्यांनी राज्य सरकारचा निषेध केला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला.