आठवणीतील ‘सारे..’

By Admin | Updated: April 3, 2015 00:39 IST2015-04-03T00:32:17+5:302015-04-03T00:39:14+5:30

‘महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील जुने-जाणते नेते’

'All ..' in the memories | आठवणीतील ‘सारे..’

आठवणीतील ‘सारे..’

‘महाराष्ट्राच्या समाजवादी चळवळीतील जुने-जाणते नेते’ अशीच आप्पासाहेब ऊर्फ सा. रे. पाटील यांची ओळख होती. त्यांच्या निधनाने या चळवळीतील हा दुवा निखळला. महाराष्ट्राच्याच नव्हे ‘देशभरातील विधिमंडळातील सर्वांत ज्येष्ठ आमदार’, ‘साखर कारखानदारीतील अभ्यासू नेतृत्व’ म्हणून ते परिचित होते. अत्यंत साधी राहणी व सतत कार्यमग्न राहणे हे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य. साखर कारखानदारीबद्दल त्यांचा बारकाईने अभ्यास होता. स्वाभिमानी शेतकरी संघटनेची चळवळ व खासदार राजू शेट्टी यांचे नेतृत्वही शिरोळ तालुक्यातूनच उदयाला आले. त्यामुळे संघटनेच्या चळवळीची पहिली झळ सा. रे. पाटील यांच्या नेतृत्वाखालील दत्त कारखान्यास बसे; परंतु सा. रे. यांचे मोठेपण असे की, त्यांनी आजअखेर संघटनेला व शेट्टी यांनाही कारखान्यात शिरकाव होऊ दिला नाही. संघटना भक्कम होत असतानाच सा. रे. यांच्यावरील सर्वसामान्य शेतकऱ्यांचा, सभासदांचा विश्वास कायम राहिला. ‘उत्तम चालविलेला कारखाना’ हे त्याचे सगळ््यात महत्त्वाचे कारण. संघटना मागते त्यापेक्षा जास्त दर देण्यात ते पुढे राहिले. ऊसदराच्या बैठकीत आम्हाला परवडत नाही, राजू (खासदार शेट्टी यांना) तूच काही तरी मार्ग काढ, असे ते विनवणी करत; परंतु नंतर मात्र सर्वाधिक उचल गनिमी काव्याने जाहीर करून संघटनेच्या आंदोलनातील हवा काढून घेत. सा. रे. पाटील यांचा आणखी एक वेगळा पैलू म्हणजे समाजवादी, ध्येयवादी संस्था-संघटना व व्यक्तींनाही ते खूप मदत करत. साने गुरुजी यांनी स्थापन केलेल्या पुण्यातील साधना ट्रस्टच्या पाठीशी ते भक्कमपणे उभे होते. साधना ट्रस्टचे विश्वस्त म्हणून ते तीस वर्षे काम करत होते. मागच्या सहा-सात वर्षांत ते कार्यकारी विश्वस्त झाले. एस. एम. जोशी, आचार्य जावडेकर, रावसाहेब पटवर्धन यांचा सहवास त्यांना लाभला. त्यांच्या विचारानेही ते प्रभावित झाले. या नेत्यांची आठवण म्हणूनच त्यांनी आपल्या हरितगृहास ‘श्रीवर्धन बायोटेक’ (‘श्री’ हा श्रीधरमधला आणि पटवर्धनमधील ‘वर्धन’) असे नाव दिले. साधना साप्ताहिकाशी त्यांचे इतक्या वर्षांचे संबंध. यदुनाथ थत्तेपासून ते आताच्या नव्या पिढीतील विनोद शिरसाठ यांच्यापर्यंत संपादक बदलले तरी त्यांचे सर्वांशी तितकेच चांगले संबंध राहिले. ‘साधना’ साप्ताहिकास वर्गणीदार मिळवून देण्यात व अंकांमध्ये सातत्याने जाहिराती देण्यात ते कायम पुढे होते, अशी वैचारिक साप्ताहिके चालली पाहिजेत, ती वाढली पाहिजेत असाच त्यांच्या त्यामागील हेतू होता. आपण मदत करतोय म्हणून माझे काहीतरी त्यामध्ये छापा, असा आग्रह त्यांनी उभ्या आयुष्यात कधीच केला नाही. आज-काल माध्यमांमध्ये जाहिरातदारांचे प्राबल्य वाढत आहे अशा काळात सातत्याने अनेक वर्षे वेगवेगळ््या मार्गाने आर्थिक मदत करूनही त्या बदलात कोणतीच अपेक्षा न करणे यातच सा. रे. यांचे मोठेपण व त्यांनी जपलेली विचारांची बांधीलकी दिसून येते. साखर कारखान्याचा अध्यक्ष म्हणजे राजकारण अशीच प्रतिमा ठळक झाली असताना सा. रे. यांनी मात्र सातत्याने सत्तेचा उपयोग समाजाच्या भल्यासाठी किती विविधांगी पद्धतीने करता येतो हेच कृतीतून दाखवून दिले. सा. रे. यांचे दुसरे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे, ते कधीच थकत नव्हते. दिल्ली, मुंबईपासूनचा प्रवास असो ते स्वत:च सगळीकडे जात. मंत्री, अधिकाऱ्यांना भेटून काम करण्याबाबत आग्रह धरत. मृत्यूनंतर आपला देहसुद्धा समाजाच्या उपयोगासाठी यावा म्हणून दान करणारा हा खरा ‘समाजवादी’. तत्त्वज्ञान मृत्यूनंतरही आत्मसात करणारा. जेव्हा डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाला त्यादिवशी दुपारी त्यांनी तत्कालीन कार्यकारी संपादक विनोद शिरसाठ यांना फोन केला व आपण सगळे लढत राहायचे, आपणच नरेंद्र म्हणून काम करायचे, असा विश्वास दिला. त्या विश्वासाच्या आधारावरच गेली पावणे दोन वर्षे ‘साधना’ची वाटचाल सुरू आहे. आज हा विश्वास देणारे वडीलधारे नेतृत्वच पडद्याआड गेले. सा. रे. यांनी आत्मकथन लिहिलेले नाही; परंतु ते जे जगले, त्याला महत्त्व असल्याने ते कुठेतरी कागदावर आले पाहिजे यासाठी त्यांच्याकडे आग्रह धरल्यावर काही आठवणी सांगायला ते तयार झाले. त्यानुसार पुण्यातील किशोर रक्तापे यांनी त्यांच्याविषयीच्या आठवणी शब्दबद्ध केल्या आहेत. त्यातून तयार झालेले पुस्तक लवकरच साधना प्रकाशनातर्फे प्रकाशित होणार आहे.
                                                                                                                                               - विश्वास पाटील

Web Title: 'All ..' in the memories

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.