‘थेट पाईपलाईन’चे सर्व परवाने तीन महिन्यांत
By Admin | Updated: January 6, 2017 00:20 IST2017-01-06T00:20:38+5:302017-01-06T00:20:38+5:30
अमल महाडिक : कामाचा प्राधान्यक्रम ठरवा

‘थेट पाईपलाईन’चे सर्व परवाने तीन महिन्यांत
कोल्हापूर : काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेसाठी आवश्यक असणारे सर्व परवाने येत्या मार्चपर्यंत देण्यात येतील. मात्र, महानगरपालिका प्रशासनाने कामाचा प्राधान्यक्रम ठरवून ही योजना लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन भाजपचे आमदार अमल महाडिक यांनी गुरुवारी महानगरपालिकेत झालेल्या आढावा बैठकीत केले. योजनेचे काम सुरू करण्यास जलसंपदा विभागाने कालच परवानगी दिली असून, कामात सातत्य ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.
थेट पाईपलाईन योजनेच्या परवानगीबाबत माझी जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांच्याशी बैठक झाली असून, परवानगीअभावी काम थांबणार नाही, असे त्यांनी सांगितले आहे. जॅकवेल, पंपहाऊस, इंटकवेल, आदी कामे सुरू करावीत, असे महाजन यांनी सांगितल्याची माहिती आमदार महाडिक यांनी दिली. पाणी योजनेच्या कामाचे प्राधान्यक्रम ठरवा. त्यानुसार काम करा. प्रत्येक आठ-दहा दिवसांनी महापौरांच्या अध्यक्षतेखाली कामाचा आढावा घेण्याकरिता बैठक घ्या, कामाची माहिती द्या, शासन स्तरावर काही मदत लागणार असेल तर मला सांगा, अशा सूचनाही त्यांनी दिल्या.
फायर स्टेशनचे सक्षमीकरण करणार
टिंबर मार्के ट व फुलेवाडी येथील अग्निशमन दलाची स्थानके अधिक सक्षमीकरण करण्याकरिता राज्य सरकारचा निधी मिळतो, पण तो मिळविण्याकरिता मनपा अधिकाऱ्यांचा प्रतिसाद कमी आहे. पाठपुरावा होत नाही. तथापि, आपण स्वत: या कामात लक्ष घातले असून नागपूरच्या धर्तीवर कोल्हापुरातही पंधरा दिवसांत परवानगी मिळेल. उंच इमारतींकरिता टर्नटेबल वाहन घेण्यासही जास्तीत जास्त मदत मिळवून देऊ, असेही त्यांनी सांगितले.
समन्वय अधिकारी नेमावा
महानगरपालिका आणि शासन यांच्यात समन्वय साधण्यात अधिकारी कमी पडतात. प्रस्ताव पाठविले की, त्याचा पाठपुरावा होत नाही. त्यामुळे अशा कामासाठी एक स्वतंत्र अधिकारी नेमण्यात यावा. तो केवळ पाठपुरावा, आमच्याशी समन्वय ठेवून राहील, अशी सूचना महाडिक यांनी यावेळी केली. यावेळी विजय सूर्यवंशी, सत्याजित कदम, सुनील कदम, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, पूजा नाईकनवरे, आदींनीही महत्त्वाच्या सूचना केल्या. आयुक्त पी. शिवशंकर, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत यांनी प्रशासन करत असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.