जिल्ह्यात सर्वच पक्षांचे सेनापती पराभूत
By Admin | Updated: October 21, 2014 00:19 IST2014-10-21T00:01:26+5:302014-10-21T00:19:42+5:30
विधानसभा निवडणूक : काँग्रेस, राष्ट्रवादीसह पाच पक्षांचे जिल्हाध्यक्ष घरी

जिल्ह्यात सर्वच पक्षांचे सेनापती पराभूत
कोल्हापूर : राज्यात उच्चांकी मतदान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील निकाल धक्कादायक आहेत. प्रमुख राजकीय पक्षांचे जिल्हाध्यक्ष स्वत:चाही पराभव वाचवू शकले नाहीत. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी. एन. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील या दोघांनी भोगावती साखर कारखान्याच्या राजकारणातून एकमेकांचा पराभव केला.
राधानगरीत प्रस्थापितांविरुध्द लाटेचा फायदा घेण्यात स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रा. जालंदर पाटील अपयशी ठरले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे व भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव यांचा मतदारसंघ बदलल्याने त्यांना पराभवास सामोरे जावे लागले.
लोकसभा निवडणुकीनंतर दोन्ही काँग्रेस व युतीचा घटस्फोट झाल्यानंतर जिल्ह्यातील चित्र बदलले. दोन्ही काँग्रेस एकमेकांविरोधात लढली; पण करवीर व राधानगरी मतदारसंघांत वेगळीच समीकरणे उदयास आली. ‘भोगावती’च्या राजकारणामुळे के. पी. पाटील यांच्या विरोधात काँग्रेसची ताकद शिवसेनेचे उमेदवार प्रकाश आबिटकर यांच्या मागे उभी केली. के. पी. पाटील यांनी याच रागातून करवीरमधील राष्ट्रवादीची ताकद आमदार चंद्रदीप नरके यांच्या मागे उभी करून काटशहाचे राजकारण केले. एकमेकाला संपविण्याच्या नादात हे दोन्ही जिल्हाध्यक्ष स्वत:च संपले आणि त्याचा फायदा सेनेला झाला.
स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष पाटील राधानगरीतून पराभूत झाले. गतवेळचे मतदानही त्यांना मिळाले नाही. या मतदारसंघात प्रस्थापितांविरोधात लाट होती. तिचा फायदा पाटील यांना घेता आला नाही. जनतेच्या प्रश्नांची जाण असणारे नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते, तरीही त्यांना मतदारांनी स्वीकारले नाही. आबिटकर यांनी तडजोडीचे राजकारण करीत, ‘आता नाही तर कधीच नाही,’ असे म्हणून ताकद लावल्यामुळे ते यशस्वी झाले. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांना ऐनवेळी दक्षिण मतदारसंघातून उभे केले. २००९ च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघातून देवणे यांना ४८ हजार मते मिळाली होती. त्यामुळे त्यांनी ‘दक्षिण’मधून धाडस केले; पण मतदारांनी त्यांना नाकारले. अवघी ९०४८ मते मिळाली. भाजपचे महानगर जिल्हाध्यक्ष जाधव यांनी गेली दोन वर्षे कोल्हापूर दक्षिणमधून तयारी केली होती; पण ऐनवेळी कोल्हापूर उत्तरमधून ते लढले. येथे त्यांनी चांगली लढत देत ४०,१४० मते घेतली. त्यामुळे पाच जिल्हाध्यक्षांचा पराभव झाला पी. एन. पाटील, के. पी. पाटील व प्रा. जालंदर पाटील या तीन पाटलांना आत्मचिंतन करायला लावणारा आहे. (प्रतिनिधी)