‘त्या’ मद्यपी डॉक्टरला अटक

By Admin | Updated: February 26, 2016 01:21 IST2016-02-26T01:08:19+5:302016-02-26T01:21:11+5:30

सीपीआरमध्ये विनयभंग : लैंगिक छळ निवारण समिती अहवाल देणार

'That' alcoholic doctor was arrested | ‘त्या’ मद्यपी डॉक्टरला अटक

‘त्या’ मद्यपी डॉक्टरला अटक

कोल्हापूर : येथील छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयातील नवजात शिशू विभागातील विश्रांती कक्षात झोपलेल्या विवाहित महिला डॉक्टरचा (रा. मूळ नागपूर) विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पंकज हरिश्चंद्र पाटील (वय २४, रा. कळंबोली, ठाणे) या प्रशिक्षणार्थी डॉक्टरला गुरुवारी लक्ष्मीपुरी पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडे रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती.
जिल्हा रुग्णालयाच्या नवजात शिशू विभागात विश्रांती कक्षामध्ये झोपलेल्या विवाहित महिला डॉक्टरचा बुधवारी (दि. २४) पहाटे संशयित डॉक्टर पाटील याने मद्यधुंद व अवस्थेत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. यावेळी महिला डॉक्टरच्या पतीने त्याची धुलाई केली. त्यानंतर लक्ष्मीपुरी पोलिसांत त्याच्या विरोधात फिर्याद दिली. कारवाईच्या भीतीने
डॉ. पाटील हा वसतिगृहातून फरार झाला. त्याने मोबाईलही बंद ठेवला. पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांशी संपर्क साधून त्याला पोलीस ठाण्यात हजर होण्यास सांगितले. गुरुवारी तो हजर होणार होता. पोलिसांनी त्याची दिवसभर वाट पाहिली, परंतु तो हजर राहिला नाही. तो एका मित्राच्या आश्रयाला गेला असल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी त्या मित्राचे नाव, पत्ता व मोबाईल नंबर शोधून त्याला पोलिसी खाक्या दाखविताच रात्री आठच्या सुमारास डॉ. पाटील स्वत:हून पोलीस ठाण्यात हजर झाला. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे चौकशी सुरू होती.
दरम्यान, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता
डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी या घटनेची दोन स्तरांवर चौकशी सुरू केली आहे. त्यात लैंगिक छळ निवारण समिती व बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर सरवदे यांचा समावेश होता. या दोन्ही समितींना तत्काळ अहवाल सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. याप्रकरणी दिवसभर या समिती शिष्टमंडळाने चौकशी केली.
दरम्यान, याप्रकरणी लैंगिक छळ निवारण समिती आज, शुक्रवारी अहवाल सादर करण्याची शक्यता आहे. समितीची बैठक गुरुवारी सकाळी दहा वाजता मायक्रो लॅबॉरेटरी विभागात झाली. समितीच्या अध्यक्षा डॉ. वनिता कुलकर्णी, सदस्या डॉ. रंजना जोशी, डॉ. अपर्णा कुलकर्णी, डॉ. संगीता कुंभोजकर, डॉ. ज्योत्सना देशमुख, दिप्ती नाटेकर, प्रियदर्शनी चोरगे आदी उपस्थित होत्या. अध्यक्षांनी पीडिता, परिचारिका, सुरक्षा रक्षक व काही रुग्णांचे जबाब घेतले. ही चौकशी सुरूच होती.

Web Title: 'That' alcoholic doctor was arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.