भुदरगड तालुक्यात भाजपला गळती : चंद्रकांत पाटील यांना आणखी एक धक्का
शिवाजी सावंत
गारगोटी : भुदरगड तालुक्यात भाजपच्या पंचायत समिती सदस्या असलेल्या अक्काताई नलवडे यांनी पक्षाचा राजीनामा देऊन आमदार आबिटकर गटात सामील झाल्याने कमळाचा नेम धनुष्यबाणाने साधला आहे.तर नवीन सामील झालेले काही नेते पुन्हा परतीच्या मार्गावर लागण्याची शक्यता आहे. अक्काताई नलवडे यांच्या गळ्यात भुदरगड पंचायत समितीच्या सभापतींच्या माळ पडण्याची शक्यता आहे.
आमदार आबिटकर यांनी आमदार चंद्रकांत पाटील यांच्या गावातील ग्रामपंचायत वर निर्विवाद सत्ता मिळवली तर आता एकमेव पंचायत समिती सदस्याला आपल्या गटात घेऊन तालुक्यातील राजकारणात बार उडवून दिला आहे.
गत निवडणुकीत देशात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यावर राज्यातील इतर ठिकानांप्रमाणे भुदरगड तालुक्यातील विविध पक्षात काम करणाऱ्या नेते मंडळींनी तत्कालीन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भाजप पक्षात आली. यामध्ये मिणचे खोरीतील प्रवीण नलवडे यांनीही प्रवेश केला. पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी त्यांची पत्नी अक्काताई नलवडे यांना कमळ चिन्हावर निवडून आणले. जिल्ह्यात एकच जागा भाजपला मिळाली होती. त्यांनी चार वर्षांत या पक्षातील जुनी नेतेमंडळी जमवून घेत नसल्याने भाजपला रामराम ठोकला.
त्यांच्या या पक्षांतराने तालुक्यातील अंतर्गत गटबाजी उघड्यावर आली आहे. भाजपमध्ये जुन्या कार्यकर्त्याच्या फळीत भाजपचे संघटनमंत्री नाथाजी पाटील, अलकेश कांदळकर तर नव्याने गेलेल्या फळीमध्ये माजी जि.प. सदस्य राहुल देसाई, जिल्हा उपाध्यक्ष प्रवीणसिंह सावंत,देवराज बारदेस्कर असे अंतर्गत गट आहेत.
जुन्या नव्यांच्या वर्चस्व वादात नव्याने आलेले काही नेते पुन्हा परतीच्या मार्गावर जाण्याची शक्यता आहे.