अजितदादांच्या एन्ट्रीने ‘कृष्णा’ची हवा गरम

By Admin | Updated: November 24, 2014 23:04 IST2014-11-24T22:29:38+5:302014-11-24T23:04:37+5:30

निवडणूक रंगणार : भाजपच्या नेत्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध

Ajitad's entry 'Krishna' hot air | अजितदादांच्या एन्ट्रीने ‘कृष्णा’ची हवा गरम

अजितदादांच्या एन्ट्रीने ‘कृष्णा’ची हवा गरम

अशोक पाटील- इस्लामपूर विधानसभा निवडणुकीत भाजपला मिळालेल्या यशानंतर कऱ्हाड, वाळवा आणि कडेगावमधील नेत्यांना सहकारी संस्थांच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या तिन्ही तालुक्यांतील सहकारी संस्था काँग्रेस, राष्ट्रवादीने उभ्या केल्या आहेत. या संस्थांवर मोदी लाटेची सावली पडण्याआधी हे नेते सातारा, सांगली जिल्हा कार्यक्षेत्र असलेल्या यशवंतराव मोहिते कृष्णा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी सरसावले आहेत. माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी गळीत हंगामाच्या निमित्ताने ‘कृष्णा’वर एन्ट्री करत प्रचाराचा नारळच फोडला.
‘कृष्णा’च्या गत निवडणुकीत मोहिते-भोसले यांच्या मनोमीलनाने राजकीय गोळाबेरीज चुकली. त्यानंतर सुरेश भोसले व अतुल भोसले या पिता-पुत्रांनी कऱ्हाड दक्षिणमध्ये लक्ष केंद्रित केले. मात्र अतुल भोसले यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्याचे खापर डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर फोडून भोसले गट ‘कृष्णा’च्या निवडणुकीच्या तयारीस लागला आहे. दुसरीकडे विद्यमान अध्यक्ष अविनाश मोहिते यांच्या पाठीशी असलेले विलासकाका पाटील-उंडाळकर यांनी सातारा जिल्हा बँक आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भोसले गटाशी साटेलोेटे करण्याचा डाव आखल्याची चर्चा आहे. रविवारी कारखान्याच्या गळीत हंगामास प्रमुख पाहुणे असतानाही ते अनुपस्थित राहिले. राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटीलही या कार्यक्रमाकडे फिरकले नाहीत. त्यामुळे उंडाळकर आणि आ. पाटील यांची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गत गळीत हंगामावेळी अविनाश मोहिते यांनी प्रा. एन. डी. पाटील यांना आमंत्रित केले होते, तर यंदा अजित पवार यांना आमंत्रित करून आपल्या गटाची ताकद दाखवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे ‘कृष्णा’च्या आगामी निवडणुकीची हवा तापू लागली आहे. डॉ. इंद्रजित मोहिते यांनी स्वत:चा गट सक्षम करण्यासाठी वैद्यकीय व्यवसायातील लक्ष कमी करण्याची भूमिका घेतल्याचे समजते. त्यांना माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांचा पाठिंबा असला तरी, ते कोणत्याही पक्षाचा आधार घेऊन निवडणूक लढविणार नसल्याचे सांगत आहेत.
सध्या दक्षिण कऱ्हाड, कडेगाव आणि वाळवा तालुक्यातील नेत्यांनी ‘कृष्णा’च्या निवडणुकीवर लक्ष केंद्रित केले आहे. मात्र कोण कोणाच्या बाजूने असेल, हे मात्र सातारा जिल्हा बँक व बाजार समितीच्या निवडणुकीनंतरच स्पष्ट होणार आहे.


कृष्णा कारखान्याची आजची स्थिती बिकट आहे. नेत्यांना गळीत हंगामाला आणून प्रत्येकवर्षी डल्ला मारण्याचा उद्योग सत्ताधाऱ्यांनी चालवला आहे. वरिष्ठ नेत्यांनी कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची चेष्टा चालविली असून आगामी काळात हा कारखाना खासगी करण्याचा डाव राष्ट्रवादीकडून आखला जात आहे.
- डॉ. इंद्रजित मोहिते, माजी अध्यक्ष, कृष्णा कारखाना


गत निवडणुकीत आम्ही आणि मोहिते एकत्र होतो. आमच्या दोघांचे विरोधक विलासकाका उंडाळकर होते. मात्र विधानसभा निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांनी काँग्रेसला मदत करून आम्हाला दगा दिला. त्यामुळे आमचे कार्यकर्ते नाराज झाले आहेत. कारखान्याची निवडणूक लढविण्यास आम्हीही सक्रिय आहोत.
- डॉ. सुरेश भोसले, माजी अध्यक्ष, कृष्णा कारखाना.

Web Title: Ajitad's entry 'Krishna' hot air

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.